04 June 2020

News Flash

सेन्सेक्समध्ये शतकी भर; मुंबई निर्देशांक २५ हजारापुढे

नव्या सप्ताहाची सुरुवात शतकी निर्देशांक वाढीने करणारा सेन्सेक्स सोमवारी २५ हजाराच्या आणखी पुढे गेला.

१०५.९२ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक २५,१५०.३५ वर पोहोचला. तर ३९.६० अंश वधारणेने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,६५०.०५ पर्यंत झेपावला.

नव्या सप्ताहाची सुरुवात शतकी निर्देशांक वाढीने करणारा सेन्सेक्स सोमवारी २५ हजाराच्या आणखी पुढे गेला. १०५.९२ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक २५,१५०.३५ वर पोहोचला. तर ३९.६० अंश वधारणेने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,६५०.०५ पर्यंत झेपावला. परिणामी प्रमुख निर्देशांक त्यांच्या गेल्या तीन महिन्याच्या तळातूनही बाहेर आले.
गेल्या सप्ताहअखेर, शुक्रवारी जाहीर झालेल्या ऑक्टोबरमधील औद्योगिक उत्पादन दराच्या १० टक्क्य़ांनजीकच्या आकडय़ाच्या जोरावर बाजारात चैतन्य पसरले.
व्यवहारात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित नोव्हेंबरचा महागाई दर सलग १३ व्या महिन्यात उणे स्थितीत राहिल्याचेही गुंतवणूकदारांनी जोरदार स्वागत केले. बाजारातील सोमवारच्या व्यवहारानंतर जाहीर झालेल्या नोव्हेंबरमधील वाढत्या किरकोळ महागाई दराचा परिणाम नोंदविता आला नाही.
बाजारातील व्यवहार आता सोमवारपासून सुरू झालेल्या अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या दोन दिवसांच्या संभाव्य व्याजदर वाढीच्या बैठकीवर अवलंबून असतील.
यापूर्वीच्या दोन व्यवहारात मुंबई निर्देशांकाने २०७.८९ अंश घसरण नोंदविली आहे. तर आधीच्या आठवडय़ात आठ सत्रांपैकी केवळ एकाच व्यवहारात सेन्सेक्सने वाढ नोंदविली होती. रखडलेल्या वस्तू व सेवा कर विधेयकाबाबत गुंतवणूकदारांनी नोंदविलेल्या अस्वस्थतेचा हा परिणाम होता.
मुंबई शेअर बाजाराने सोमवारचे व्यवहार अत्यंत दोलायमान स्थितीत नोंदविले. काहीशा घसरणीने सुरुवात करणारा सेन्सेक्स सत्रात २५ हजाराखालीही उतरला होता. घाऊक किंमत निर्देशांक उणे राहिला असला तरी त्यात किरकोळ वाढ झाल्याने काहीशी चिंता निर्माण झाली. मात्र बाजाराची दिवसअखेर शुक्रवारच्या, गेल्या सप्ताहाच्या तुलनेत वाढीची ठरली.
सत्रात २५ हजाराचा टप्पा सोडताना सेन्सेक्स २४,८६७.७३ पर्यंत खाली आला होता. तर व्यवहारातील त्याचा सर्वोत्तम स्तर २५,१९४.१५ राहिला. निफ्टीने सोमवारी ७,६०० चा स्तर सोडताना व्यवहारात ७,५५१.०५ पर्यंत घसरण राखली. सत्रात ७,६५०.०५ पर्यंत वाढ नोंदविल्यानंतर निफ्टी शुक्रवारच्या तुलनेत वधारला.

नजर फेड बैठक फलितावर
काळे-पिवळे सोने कमालीच्या उतरणीला..
वृत्तसंस्था : अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हची संभाव्य व्याजदर वाढ दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल प्रति िपप ३८ डॉलरच्या खाली उतरले आहेत. तर लंडनच्या सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति औन्स १,०५० डॉलरवर येऊन ठेपला आहे. गेल्याच महिन्यात प्रति पिंप ५० डॉलरवरून ढळलेले खनिज तेलाचे दर कमालीने घसरत आहेत. सोमवारी ब्रेन्ट खनिज प्रकारच्या तेलाचे दर तर ३८ डॉलरच्याही खाली आले. गेल्या सप्ताहात प्रमुख तेल उत्पादक देशांकडून उत्पादनात कसूर न करण्याच्या निर्णयानंतर तेल दरात आणखी घसरण नोंदली जात आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात पिवळे सोने आता प्रति औन्स १,१०० चा आकडाही लांबणीवर टाकत आहेत. युरोपच्या बाजारात सोन्याचे दर १,०६६.५० वर येऊन पोहोचले.
रुपयाची ६७ खालील गटांगळी
मुंबई : डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरत असलेल्या भारतीय चलनाने नव्या आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी ६७ पर्यंत पुन्हा एकदा घसरण नोंदविली. डॉलरच्या तुलनेत सोमवारी २१ पैशांनी घसरत रुपया ६७.०९ पर्यंत घसरला. चलनाचा हा गेल्या जवळपास अडीच वर्षांचा – २७ महिन्यांचा तळ होता. नव्या आठवडय़ातील व्यवहारच ६७.०९ असा नरमाईने सुरू करणारा रुपया सोमवारच्या सत्रात ६७.१२ पर्यंत खोलात गेला आणि दिवसअखेर पुन्हा तो सुरुवातीच्या स्थानावर विराजमान झाला.
सराफा बाजारात संमिश्र व्यवहार
मुंबई : शहरातील सराफा बाजारात सप्ताहारंभी मौल्यवान धातूंच्या दरांत संमिश्र हालचाल नोंदली गेली. स्टॅण्डर्ड सोन्याचा तोळ्याचा भाव सोमवारी ११५ रुपयांनी वाढून २५,३४५ रुपयांपुढे गेला. पांढऱ्या धातूच्या – चांदीच्या दरात मात्र घसरण नोंदली गेली. चांदीच्या किलोचा भाव व्यवहारअखेर ११५ रुपयांनी रोडावत ३३,९१५ रुपयांपर्यंत येऊन ठेपला. चांदी आता ३४ हजार रुपयांच्याही खाली आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2015 7:00 am

Web Title: sensex recovers from 3 month low ends 106 points up nifty settles at 7650
Next Stories
1 ‘पर्ल्स’वर कारवाई ; मालमत्ता जप्तीचे सेबीचे आदेश
2 विदेशी कंपन्यांचीही नव्या वर्षांत वाहन किंमत वाढ
3 आरोग्य विमा योजना कधी?
Just Now!
X