सेंट्रल बँकेला सवरेत्कृष्ठतेचे तीन पुरस्कार
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने अलीकडेच नवी दिल्ली येथे झालेल्या ‘सीआयएमएसएमई- एमएसएमई बँकिंग प्रावीण्य पुरस्कार’ सोहळ्यात तीन मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या प्रोत्साहनार्थ कार्यरत बडय़ा बँकांसाठीचा द्वितीय पुरस्कार, वित्तीय सर्वसमावेशकतेच्या कार्यासाठी सवरेत्कृष्ठ बँक पुरस्कार आणि पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत कामगिरीसाठी बँकेला विशेष पदक देऊन गौरविण्यात आले.
सेंट्रल बँकेचे कार्यकारी संचालक बी. के. दिवाकर यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र यांच्या हस्ते नवी दिल्लीतील समारंभात प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारताना.

जीपी पारसिक बँकेची विटावा येथे नवीन शाखा
ठाणे: गोपीनाथ पाटील पारसिक जनता सहकारी बँकेच्या विटावा येथील नवीन शाखेचे अलीकडेच बँकेचे अध्यक्ष रणजीत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. बँकेची ही ४८ वी शाखा असून, ठाणे जिल्ह्य़ाव्यतिरिक्त, नवी मुंबई, मुंबई, रायगड, पुणे, नाशिक, इचलकरंजी या ठिकाणी शाखाविस्तार फैलावला आहे. शाखेच्या उद्घाटनप्रसंगी उपाध्यक्ष नारायण गावंड, माजी अध्यक्ष व संचालक जयराम पाटील, माजी अध्यक्ष विजय गावंड, संचालक डी डी घरत, अ‍ॅड. पी सी पाटील, प्रकाश पाटील व अन्य संचालक उपस्थित होते.

जनसेवा सहकारी बँकेचे १००० कोटींचे व्यवसाय-लक्ष्य
मुंबई: जनसेवा सहकारी बँक (बोरिवली) लि.च्या विरार पश्चिम येथील १२ व्या शाखेचे अलीकडेच वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रसंगी गोपाळ शेट्टी आणि चिंतामण वनगा हे खासदार, तर क्षितिज ठाकूर, मनिषा चौधरी हे आमदार उपस्थित होते. बँकेने डिसेंबर २०१४ अखेर ९०० कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण केला असून, लवकरच १००० कोटी रुपयांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट गाठले जाईल, असे बँकेचे अध्यक्ष पंकज गोराडिया यांनी सांगितले. बँक लवकरच वसई येथे १३ वी शाखा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.