वर्षभरानंतर प्रत्यक्षात आलेल्या सन फार्मा- रॅनबॅक्सी विलीनीकरणामुळे भांडवली बाजारातील रॅनबॅक्सीची सूचिबद्धता (डिलिस्टिंग) संपुष्टात येणार आहे. ४ अब्ज डॉलरच्या व्यवहारामार्फत देशातील सर्वात मोठी औषधनिर्मिती कंपनी उदयास येताना रॅनबॅक्सी भागधारकांना कंपनीच्या प्रत्येक समभागांमध्ये सन फार्माचे ०.८ समभाग (रॅनबॅक्सीच्या १० मागे सन फार्माचे ८ समभाग) प्राप्त होतील. विलीनीकरणानंतर दोन्ही कंपन्यांचे समभाग मूल्य व्यवहारात २ टक्क्यांहून अधिक उंचावले.
उभय कंपन्यांची विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा बुधवारी मुंबईत करण्यात आली. यानंतर समभाग मिळकतीबाबत मुंबई शेअर बाजारालाही कळविण्यात आले. उभय कंपन्यांमार्फत जागतिक अस्तित्व अधिक विस्तारण्यासह संशोधन व विकासावर भर देण्याबरोबर येत्या तीन वर्षांत २५ कोटी डॉलरच्या खर्चाची तयारी सन फार्माचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक दिलीप शांघवी यांनी पत्रकार परिषदेत दर्शविली. रॅनबॅक्सीच्या विलीनीकरणानंतर सन फार्मामध्ये जपानची दाईची सॅन्को ही दुसरी मोठी भागधारक कंपनी आहे. रॅनबॅक्सीला आपल्यात सामावून घेतल्याने सन फार्मा आता जगातील पाचवी मोठी कंपनी बनली आहे.
सन फार्मा रु.१,०५३ +१.२९%
रॅनबॅक्सी रु.८३२ +१.६३%
(मुंबई शेअर बाजारातील समभागांचा बुधवारअखेरचा भाव)