४.२ अब्ज डॉलर व्यवहाराने जगातील अव्वल पाचव्या कंपनीचा मान

मुंबई : कृषी रसायन क्षेत्रातील आघाडीच्या ‘यूपीएल’ने ‘आर्यस्टा लाईफसायन्स’चे यशस्वी अधिग्रहण केले. ४.२ अब्ज डॉलरच्या व्यवहाराने कंपनी क्षेत्रातील जगातील पाचवी मोठी कंपनी बनली आहे.

या व्यवहारानंतर ‘यूपीएल’मार्फत होणारी एकत्रित विक्री ५ अब्ज डॉलरच्या घरात पोहोचणार आहे. त्याचबरोबर आफ्रिका, रशिया तसेच पूर्व युरोपियन बाजारपेठेंमध्ये कंपनीला शिरकाव करण्याची संधी मिळाली आहे.

या भागात कंपनीला ऊस, कॉफीसारख्या सध्या अस्तित्व नसलेल्या उत्पादन क्षेत्रातील सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. याबाबतचा पहिला व्यवहार जुलै २०१८ मध्ये जाला होता. ‘यूपीएल’ने तिची उपकंपनी यूपीएल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून हा व्यवहार केला आहे. तिच्याबरोबर अबु धाबी इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटी व टीपीजीचीही गुंतवणूक आहे. उभय कंपन्यांचा १.२ अब्ज डॉलरसह २२ टक्के तर ‘यूपीएल’ची सर्वाधिक, उर्वरित ७८ टक्के गुंतवणूक आहे. या व्यवहारासाठी कंपनीने देशी-विदेशी बँका तसेच वित्त कंपन्यांमार्फत ३.९ अब्ज डॉलर उभे केले आहेत. कंपनीच्या प्रवर्तकांचा हिस्सा २८ टक्के असेल.

अधिग्रहणापूर्वी जागतिक कृषी रसायन क्षेत्रात ‘यूपीएल’ व ‘आर्यस्टा’ अनुक्रमे सातवी व दहावी कंपनी होती. ‘यूपीएल’चे विविध ७६ देशात अस्तित्व असून १३० देशांमध्ये कंपनीच्या विविध उत्पादनांची विक्री होते.

यानिमित्ताने कंपनीने ‘ओपनएजी’ या मोहिमेद्वारे खुले कृषी जाळे विकसित करण्याचे धोरण आखल्याचे ‘यूपीएल ग्लोबल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जय श्रॉफ यांनी सांगितले. या व्यवहारामार्फत कंपनीला येत्या दोन वर्षांत २५ कोटी डॉलरच्या व्यवसायाची संधी असल्याचेही सांगण्यात आले.