डोंबिवली : डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना अकरा टक्के वेतनवाढ देण्याचा करार ठाणे जिल्हा सहकारी बँक कर्मचारी महासंघ आणि डोंबिवली नागरी सहकारी बँक व्यवस्थापनात झाला. एप्रिल २०२१ ते मार्च २०२४ साठी हा वेतन करार असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना महासाथीच्या दीड वर्षांत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने ग्राहक सेवा दिली; करोनायोद्धे म्हणून त्यांच्या सेवेचा हा सन्मान असल्याची प्रतिक्रिया बँकेचे अध्यक्ष उदय कर्वे यांनी दिली. या कराराप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतनवाढीबरोबर गृह कर्ज, वाहन, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज उपलब्ध होणार आहे.

ठाणे जिल्हा कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या करारासंबंधात दाखवलेली प्रगल्भता कौतुकास पात्र असून उद्योग विश्वात व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना यांनी लढण्याची मन:स्थिती सोडून यापुढे दोघांनी एकत्र मिळून आव्हानात्मक परिस्थितीला एकदिलाने सामोरे जाणे आवश्यक आहे. ते डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या संदर्भात प्रत्यक्ष घडत आहे. करोना महासाथीच्या काळात उभयपक्षी सकारात्मक, सामंजस्याने भूमिका घेत अत्यंत कमी कालावधीत व सौहार्दपूर्ण चर्चेने हा वेतन करार झाला, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सनदी लेखापाल उदय कर्वे यांनी दिली.

गेल्या दीड वर्षांत करोना विषाणू साथीने महाभयावह परिस्थिती निर्माण केली आहे. नोकरी, रोजगार क्षेत्रात बाहेर बिकट परिस्थिती असताना डोंबिवली नागरी बँकेने तत्परतेने कर्मचारी वेतनवाढीचा करार अल्प कालावधीत एकाच बैठकीत केला हे कौतुकास्पद आहे; कर्मचारी संघटनेसाठीही ही महत्त्वपूर्ण घटना आहे, असे ठाणे जिल्हा बँक कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल ढुमणे यांनी सांगितले. कराराप्रसंगी बँकेचे संचालक, महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेतन करारामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 percent pay hike for dombivli nagari sahakari bank employees ssh
First published on: 24-07-2021 at 01:57 IST