येत्या वर्षांत भांडवली बाजारात प्रवेशासाठी अनेक कंपन्यांत चढाओढ सुरू असून, मागील दोन दिवसांत अर्धा डझनाहून अधिक कंपन्यांनी ‘सेबी’कडे प्रारंभिक खुल्या भागविक्रीसंबंधाने प्रस्तावाचे मुसदे दाखल केले आहेत.
चालू वर्षांत सप्टेंबरअखेपर्यंत आधीच्या दोन वर्षांच्या तुलनेत दुप्पट म्हणजे १५ कंपन्यांनी भागविक्रीतून भांडवल उभारणी केली आहे. २०१३ व २०१४ च्या पहिल्या नऊ महिन्यांसाठी हेच प्रमाण अनुक्रमे तीन व सहा कंपन्या असे होते. शिवाय ‘सेबी’कडून भागविक्रीसाठी हिरवा कंदिल मिळविलेल्या आणखी १२ कंपन्यांकडून लवकरच भागविक्री प्रस्तावित केली जाणे अपेक्षित आहे. त्यात नव्याने मंजुरीसाठी येणाऱ्या या कंपन्यांची भर पडणे सुरूच आहे.
काटकर कुटुंब प्रवर्तक असलेल्या क्विकहिल टेक्नॉलॉजीज् या मुंबईस्थित कंपनीने २५० कोटी रुपये भागविक्रीमार्फत उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज्, जेफरीज् इंडिया आणि जे पी मॉर्गन इंडिया या कंपन्या या प्रस्तावित भागविक्रीच्या व्यवस्थापक म्हणून नियुक्त केल्या गेल्या आहेत.
वाहनांसाठी सुटय़ा भागाची निर्मिती करणाऱ्या संधार टेक्नॉलॉजीजने भागविक्रीद्वारे बाजारातून ३०० कोटी रुपये उभारण्यासाठी सेबीकडे परवानगी मागणारा अर्ज दाखल केला आहे. होसूर, तामिळनाडू येथे नवीन उत्पादन प्रकल्प स्थापण्याची कंपनीची योजना आहे.
दोन दिवसांपूर्वी लार्सन अॅण्ड टुब्रोचे माहिती-तंत्रज्ञान व्यवसायाचे अंग असलेल्या एल अॅण्ड टी इन्फोटेक आणि जीएनए अॅक्सल्स यांचे भागविक्री प्रस्ताव सेबीकडे दाखल करण्यात आले. एल अॅण्ड टी इन्फोटेकचा प्रत्येकी १ रु. दर्शनी मूल्य असलेल्या पावणेदोन कोटी समभागांच्या विक्रीचा प्रस्ताव आहे, त्या उलट जीएनए अॅक्सल्सचा ६३ लाख समभागांच्या विक्रीचा मानस आहे.
शिवाय नारायण हृदयालया, पराग मिल्क फूड्सचेही सेबीकडे प्रस्ताव दाखल झाले आहे. बीएसई एसएमई मंचावर सूचिबद्धतेसाठी विविध सात कंपन्यांच्या भागविक्रीची प्रक्रिया चालू आठवडय़ात सुरू आहे. त्यात मुंबईस्थित गंगा फार्मास्युटिकल्स, नारायणी स्टील्स आदींचा समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2015 रोजी प्रकाशित
भागविक्रीसाठी भाऊगर्दी
भांडवली बाजारात प्रवेशासाठी अनेक कंपन्यांत चढाओढ सुरू
Written by रोहित धामणस्कर
First published on: 01-10-2015 at 07:32 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 new companies want to be listed in capital market present proposals to sebi