नवी दिल्ली : चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने भारतातील करदायित्व चुकवण्यासाठी चीनमध्ये बेकायदेशीररीत्या ६२,४७६ कोटी रुपये हस्तांतरित केल्याचे गुरुवारी सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’कडून सांगण्यात आले. हा बेकायदेशीर व्यवहार विवोमधील चिनी कर्मचारी आणि काही बनावट भारतीय कंपन्यांच्या माध्यमातून केला गेल्याचा ‘ईडी’चा दावा आहे.

मंगळवारी काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाईतून चिनी स्मार्टफोन निर्मात्या विवो आणि तिच्याशी संलग्न कंपन्यांशी संबंधित देशभरात ४४ ठिकाणांवर ‘ईडी’ने छापे टाकले होते. यामध्ये काही चिनी नागरिकांनी २०१८ ते २०२१ दरम्यान देशातून पलायन केले तर या करचुकवेगिरीमध्ये २३ भारतीय कंपन्यांचा समावेश असून भारतीय सनदी लेखापाल (सीए) नितीन गर्ग यांनी याकामी मदत केल्याचे ‘ईडी’च्या तपासातून पुढे आले. या २३ कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे ६२,४७६ कोटी रुपये हस्तांतरण (रेमिटन्स) सुविधेच्या माध्यमातून बेकायदेशीररीत्या धाडण्यात आले. विवोच्या १,२५,१८५ कोटी रुपये इतक्या उलाढालीच्या तब्बल ५० टक्के रक्कम बेकायदेशीररीत्या चीनमध्ये वळविल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कारवाई करत असताना काही चिनी नागरिकांसह विवो इंडियाचे कर्मचारी सहकार्य करत नसल्याची, महत्त्वाची माहिती आणि डिजिटल उपकरणे लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ईडीने केला आहे. यात गुंतलेल्या विविध संस्थांच्या ११९ बँक खात्यांमध्ये ठेवलेली ४६५ कोटी रुपयांची रक्कम, ७३ लाख रुपये रोख आणि २ किलो सोनेदेखील जप्त केले गेले आहे.