वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ई-व्यापार क्षेत्रातील जागतिक महाकाय कंपनी अ‍ॅमेझॉनकडून जाहीर करण्यात आलेल्या नोकरकपातीमुळे भारतातील कंपनीतील शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरी गमावावी लागू शकते. सर्वच बडय़ा जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांकडून व्यवसाय पुनर्रचना व काटकसर म्हणून नोकऱ्यांना कात्री लावली जात असली तरी इतरांपेक्षा अ‍ॅमेझॉनकडून भारतात केली जाणारी कपात सर्वात मोठी असेल.

अ‍ॅमेझॉनकडून जागतिक स्तरावर १०,००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. त्याला गुरुवारपासून सुरुवात होणे अपेक्षित आहे. भारतात या जागतिक कंपनीचे ई-कॉमर्स, वेब सेवा आणि व्हिडीओ आणि म्युझिक स्ट्रीमिंग सेवेसह अनेक व्यवसाय चालविले जातात. अ‍ॅमेझॉनच्या भारतात कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या अंदाजे १००,००० च्या घरात जाणारी आहे. तथापि सूत्रांच्या हवाल्यानुसार, भारतातील नोकऱ्यांमधील कपात ही फेसबुकसारख्या इतर बडय़ा कंपन्यांच्या नोकरकपातीपेक्षा जास्त असू शकते.

भारतातील नोकऱ्यांमध्ये कपातीच्या योजनेला अंतिम रूप दिले जात आहे आणि संख्येसंबंधाने चर्चा सुरू आहे, अशी माहिती या घडामोडींशी संलग्न माहीतगार सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली. भारतात, अ‍ॅमेझॉनच्या वेगवेगळय़ा व्यवसायांची मुख्य कार्यालये बेंगळूरुमध्ये आहेत. इतर मोठय़ा शहरांमधील कर्मचारी हे भाडय़ाच्या जागेत तसेच को-वर्किंग सुविधांच्या माध्यमातून काम करतात. एकंदरीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांसह, अ‍ॅमेझॉनकडून भारतात एक लाख १० हजारांहून अधिक लोकांना रोजगार दिला जातो. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने सर्वप्रथम अ‍ॅमेझॉनच्या जागतिक स्तरावरील नोकरकपातीच्या योजनेचे वृत्त दिले. या वृत्तानुसार, अभियांत्रिकीसह अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड चालवली जाऊ शकते आणि याची सुरुवात कंपनीकडून चालू आठवडय़ात लवकरात लवकर सुरू केली जाणे अपेक्षित आहे.

जागतिक स्तरावर अनेक मोठय़ा तंत्रज्ञान कंपन्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येऊ घातले आहे. मेटाने गेल्या आठवडय़ात ११,००० नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली आणि इलॉन मस्कने ताबा मिळविल्यापासून ट्विटरच्या मनुष्यबळात निम्म्याने कपात झाली आहे. अ‍ॅमेझॉनमध्ये तिमाहीहून अधिक कालावधीपासून नवीन नियुक्त्या बंद आहेत. आता तर वेगवेगळय़ा व्यवसाय आणि कार्य आघाडय़ांवर कर्मचाऱ्यांच्या कामाची नव्याने आखणी करण्याचा आदेश निघाला असून, अनेक ठिकाणी अतिरिक्त ठरविलेल्या विद्यमान कर्मचाऱ्यांना घरी बसविले जाऊ शकेल.

‘मेटा’कडून भारतातील प्रमुखपदी संध्या देवनाथन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी दिल्ली : फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप या समाजमाध्यम व्यासपीठांची मालकी असणारी कंपनी ‘मेटा’ने संध्या देवनाथन यांची भारतातील कारभाराच्या उपाध्यक्षपदी गुरुवारी नियुक्ती केली आहे. अलीकडेच राजीनामा देणाऱ्या अजित मोहन यांची त्या जागा घेतील आणि नववर्षांत १ जानेवारी २०२३ पासून नवीन पदावर रुजू होतील. देवनाथन २०१६ मध्ये मेटामध्ये सामील झाल्या आणि त्यांनी सिंगापूर व व्हिएतनाम व्यवसाय आणि तेथील नेतृत्वदायी संघाचे पुढारपण केले तसेच दक्षिणपूर्व आशियामध्ये मेटाच्या ई-व्यापार उपक्रमाच्या आखणीस मदत केली आहे. २०२० मध्ये त्या इंडोनेशियामध्ये गेल्या आणि जागतिक स्तरावर मेटासाठी सर्वात मोठी व्यवसाय शाखा असलेल्या गेमिंग उपक्रमाचे त्यांनी नेतृत्व केले.