निवडणुकीतील ‘सबका साथ, सबका विकास’ घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरुवारी आपल्या पोतडीतून समाजातील प्रत्येक घटकासाठी आणि देशातील वेगवेगळ्या भागांसाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. सत्तेवर येऊन अवघे ४५ दिवस झाले असताना लगेचच सरकारकडून फार अपेक्षा ठेवू नका, असे आपल्या भाषणाच्या सुरुवातीला सांगणाऱया जेटली यांनी वेगवेगळ्या योजना आणि नवनवीन कार्यक्रम जाहीर करून प्रत्येकालाच काही ना काही दिल्याचे दाखविण्याचाही प्रयत्न केला. मात्र, अनेक नव्या योजनांसाठी करण्यात आलेली अर्थसंकल्पीय तरतूद तोकडी असल्याने त्यातून लगेचच फारसे काही हाती लागण्याची शक्यता कमीच आहे. सर्वसामान्य करदात्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्राप्तिकराच्या दरात कोणताही बदल त्यांनी सुचविलेला नाही. त्यातच करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ५० हजारांनी वाढविण्याचे जाहीर करून त्यांनी मध्यमवर्गीयांना चुचकारण्याचे प्रयत्न केले आहेत.
लोकसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प. इराकमधील स्थिती, पावसाने दिलेली ओढ, महागाई यामुळे जेटली अर्थसंकल्पात काय तरतुदी करतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष होते. खुद्द जेटली यांनीही पाऊस आणि इराकमधील स्थितीमुळे तेलाच्या किंमतीवर होणारा परिणाम यावर भाषणाच्या सुरुवातीलाच चिंता व्यक्त केली. स्थिर विकास साधण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून, विकासदर पुढील ३ ते ४ वर्षांत ७ ते ८ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असे जेटली यांनी सांगितले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारच्या काळातील योजना आणि धोरणे पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचेही मोदी सरकारने ठरविले असून, त्याचाच एक भाग म्हणून नदी सुधार योजनेचा अभ्यास करण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश आणि गुजरातकडे विशेष लक्ष
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांनी भाजपच्या पारड्यात आपले मत टाकले होते. त्याचीच परतफेड करण्याचा काहीसा प्रयत्न मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. लखनौ आणि अहमदाबादमधील मेट्रो प्रकल्पांसाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर या दोन्ही राज्यांमध्ये आयआयटी आणि आयआयएमही सुरू करण्यात येणार आहेत. मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधून वाहणाऱया गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी २०३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, गंगा जलवाहतुकीसाठीही चार हजार २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा सुमारे १६०० किलोमीटरचा मार्ग आहे. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकासाठीही २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी या स्मारकाची पायाभरणी केली होती.
नवे काही
जेटली यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात काही नवीन घोषणाही केल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे
मणिपूरमध्ये देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ
किसान टीव्ही चॅनेल सुरू करणार, त्यासाठी १०० कोटींची तरतूद
‘मुली वाचवा, मुली वाढवा’ योजनेची घोषणा, त्यासाठी १०० कोटींची तरतूद
महाराष्ट्रातील विदर्भासह चार ठिकाणी एम्स रुग्णालये
देशात १०० स्मार्ट शहरे विकसित करणार
सहा महिन्यात ई-व्हिसा सुरू करणार
६०० नवी कम्युनिटी नभोवाणी केंद्र, त्यासाठी १०० कोटींची तरतूद
मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी १०० कोटींची तरतूद
२४ तास वीजपुरवठ्यासाठी ग्राम ज्योती योजना
प्राप्तिकराचे तंटे जलदगतीने सोडविण्यासाठी लवाद नेमणार
देशात पंतप्रधान सिंचन योजना सुरू करणार, त्यासाठी १००० कोटी रुपयांची तरतूद
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2014 रोजी प्रकाशित
अर्थसंकल्पातही ‘सबका साथ, सबका विकास’ची छबी
निवडणुकीतील 'सबका साथ, सबका विकास' घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरुवारी आपल्या पोतडीतून समाजातील प्रत्येक घटकासाठी आणि देशातील वेगवेगळ्या भागांसाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न केला.

First published on: 10-07-2014 at 11:35 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arun jaitley presents maiden budget in loksabha