दूरसंचार क्षेत्र खासगीकरणासाठी खुले झाल्यानंतर सर्वप्रथमच शिरकाव करणारी आणि मोबाइल ग्राहकसंख्येत देशातील सर्वात मोठी कंपनी बनलेल्या भारती एअरटेलने २० कोटींचा पल्ला गाठला आहे. व्यवसायाची दोन दशके पूर्ण करणाऱ्या भारती एअरटेलने ही अनोखी कामगिरी बजावतानाच जगातील चौथी मोठी दूरसंचार कंपनी म्हणूनही मान मिळविला आहे.
देशात ९० च्या दशकात दूरसंचार क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी मोकळे झाल्यानंतर भारती एअरटेलला नोव्हेंबर १९९४ मध्ये मोबाइलसाठी पहिल्यांदा परवाना मिळाला. यानंतर पुढील वर्षांतच कंपनीने दूरसंचार सेवा सुरू केली. जगातील दुसरा मोठा मोबाइलग्राहक देश असलेल्या भारतात कंपनीने आता २०.०८ कोटी मोबाइलधारक जोडत हा टप्पा पार करणारी पहिली कंपनी ठरली आहे.
भारती एअरटेल ही देशातील सर्वात मोठी मोबाइलधारक असणारी कंपनी आहेच. जानेवारीअखेरच्या २० कोटींपैकी निम्मे ग्राहक हे अवघ्या गेल्या पाच वर्षांतच मिळविले आहेत. १० कोटी ग्राहकसंख्येचा स्तर कंपनीने २००९ मध्येच ओलांडला होता. कंपनीचा बाजारहिस्सा सर्वाधिक, २८.१ टक्के आहे. लूप मोबाइलवर ताबा मिळवतही कंपनी ७० लाख धारकांसह मुंबईतील पहिली कंपनी झाली आहे.

मक्तेदारी प्रतिबंधक दिशानिर्देश लवकरच
दूरसंचार कंपन्यांच्या ताबा आणि विलीनीकरणाबाबतची बहुप्रतीक्षित मार्गदर्शक तत्त्वे येत्या १० दिवसांत जारी केली जातील. मंत्रिगटाने याबाबतच्या प्रस्तावाला यापूर्वीच मान्यता दिली आहे. आता केवळ कंपन्यांना समभागांची हस्तांतरण/विक्री करता येईल की नाही, यावरच कायदेशीर बाब तपासून पाहणे बाकी आहे. सध्या विलीन होणाऱ्या कंपनीचे ५० टक्क्यांहून अधिक समभाग नव्या कंपनीत असता कामा नये, याला मंजुरी देण्यात आली आहे.
’  एम. एफ. फारुखी, केंद्रीय दूरसंचार सचिव

व्होडाफोनप्रकरणी सामोपचारास सरकार पुन्हा तयार?
सरकारबरोबर चर्चा करण्याबाबत व्होडाफोन द्विधा मन:स्थितीत असल्यानेच हा विषय आता संपल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिल्यानंतर सरकारमधील दूरसंचार क्षेत्रातील सूत्रानेच व्होडाफोनबरोबर पुन्हा बोलणी होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली आहे. कंपनीला हवे असल्यास या विषयावर चर्चा होऊ शकते; मात्र त्यासाठी दोन्ही बाजूने व्यक्ती निश्चित होण्यासह ही प्रक्रिया फार दिवस राहता कामा नये, असेही दूरसंचार विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणाला.