देशाच्या स्थावर मालमत्ता क्षेत्रात अव्वल २५ कंपन्यांवर तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे ओझे असून, आताच पेलवेनासे झालेले कर्ज कोणत्याही क्षणी धोक्यात येऊ शकते, असा इशारा पतमानांकन संस्था ‘क्रिसिल’ने दिला आहे.
चढय़ा किमतींमुळे घटलेली मागणी व परिणामी मंदीचा सामना करीत असलेल्या स्थावर मालमत्ता उद्योगाची अर्थसहाय्याची मदार ही प्रामुख्याने अधिकाधिक परतावा अपेक्षित असलेल्या खासगी गुंतवणूकदारांवर राहिलेली आहे. या अर्थसहाय्याची मुदतपूर्ती नजीक आली असून, नजीकच्या काळात यातून मोठी गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते, असे क्रिसिलने संकेत दिले आहेत. या अव्वल २५ बिल्डरांनी या क्षेत्रासाठी बँकांनी वितरीत केलेल्या कर्जाचा निम्मा हिस्साही व्यापला असल्याचे क्रिसिलचा अहवाल सांगतो. बँकांकडून अलीकडेपर्यंत या बिल्डरांच्या ९० टक्के पतपुरवठय़ाची गरज भागविली जात होती. परंतु बँकांनी हात आखडता घेतला आणि ही मंडळी अर्थसहाय्यासाठी महागडय़ा कर्जरोखे आणि खासगी गुंतवणूकदारांच्या पैशांकडे वळल्याचे अहवाल सांगतो.