* ‘सक्तीच्या रजेवर रवानगी ’ ६७ लाखांच्या मालमत्तेवर जप्ती
कोटय़वधी रुपयांच्या कर्ज वितरणप्रकरणात लाखो रुपयांची लाच घेतल्याच्या केंद्रस्थानी असलेल्या स्टेट बँकेच्या उप व्यवस्थापकीय संचालकाभोवतीचे चौकशीचे फास सोमवारी अधिक आवळले गेले. याप्रकरणात पुढाकार घेणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने श्यामल आचार्य यांची ६७ लाख रुपयांचे सोने आणि इतर गुंतवणुकीवर टाच आणली असून बँकेनेही त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. या सर्व प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्यासाठी बँकेने दोन व्यवस्थापकीय संचालक पदावरील व्यक्तींचा गटही नेमला आहे.
सार्वजनिक स्टेट बँकेच्या कंपनी कर्ज विभागाचे नेतृत्व करणाऱ्या आचार्य यांनी वर्ल्ड्स विन्डो समूहाचे अध्यक्ष पियूश गोयल यांना ४०० कोटी रुपयांचे कर्ज वितरित करताना लाखो रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने रविवारी तक्रार दाखल करून घेतली. आचार्य यांना बँकेचे माजी सर व्यवस्थापक के. के. कुमाराह यांनी या प्रकरणात सहकार्य केल्याचेही तपास यंत्रणांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. यानंतर आचार्य यांना सोमवारपासून सक्तीच्या रजेवर पाठवितानाच बँकेतील अन्य व्यवस्थापकीय संचालक पदावरील दोन व्यक्ती याबाबतची अंतर्गत चौकशी करण्यासाठी नेमण्यात आले.
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या आर्थिक तपास यंत्रणेने रविवारी कुमाराह यांना आचार्य यांच्या घरून बाहेर पडताना ताब्यात घेतले होते. आयार्च यांच्यासाठी या प्रकरणात व्यवहार करणाऱ्या कुमाराह यांच्याकडून जे आयार्च यांना द्वावयाचे होते ते महागडे घडय़ाळही जप्त केले. यानंतर सोमवारी आयार्च यांच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात ६७ लाख रुपयांचे सोने, दागिने तसेच अन्य मुदत ठेवींची कागदपत्रे आदी ताब्यात घेतली. या व्यतिरिक्त १५ लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.
गोयल यांनी ४०० कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली असताना त्यांना यापूर्वी ७५ कोटी रुपये मंजूरही करण्यात आले आहेत. कुमाराह यांनी गोयल आणि आचार्य यांच्यातील या प्रकरणाचा दुवा म्हणून काम केले असे करतांना त्यांनी स्वत:साठी २५ व आचार्य यांच्यासाठी १५ लाख रुपये घेतल्याचे समजते. कुमाराह आचार्य यांच्या घरातून रविवारी बाहेर पडल्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून ७.७५ लाख रुपये किंमतीचे घडय़ाळ व कुमाराह यांच्याकडून ७ लाख रुपयांची रोकडही जप्त केली.