मुंबई : टाटा डोकोमोच्या सहकार्याने मुंबई शेअर बाजार हायस्पीड वाय-फाय सेवा पुरवणार आहे. केंद्रीय दळणवळण व माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते या सेवेचे औपचारिक उद्घाटन रविवारी पार पडले. या संयुक्त प्रकल्पाद्वारे बाजारातील पी.जे. टॉवरच्या सभोवतालच्या परिसरात जनतेला रोज चार तास मोफत वाय-फाय सेवा पुरविली जाणार आहे. मुंबई शेअर बाजाराचे अध्यक्ष रामादोराय, टाटा टेलिसíव्हसेस लिमिटेडच्या नॉन व्हॉइस सíव्हसेसचे प्रमुख सुनील टंडन हेही यावेळी उपस्थित होते. टाटा डोकोमोने देशभरातील विमानतळांवर वाय-फाय सुविधा पुरविली आहे. दिल्लीतील कॅनॉट प्लेससारख्या सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय सुविधा आहे.

ट्रेंट हायपरमार्केटचे मुंबईत ‘स्टार मार्केट’
मुंबई : ट्रेंट (टिस्को व टाटा यांची जॉएंट व्हेंचर कंपनी) यांच्या हायपरमार्केट व्यवसायातर्फे ‘स्टार मार्केट’ सुपरमार्केट स्टोअर मुंबईत सुरु केले आहे. मिरा रोड येथील या स्टोअरमध्ये खाद्यपदार्थ तसेच किराणा वस्तुंसाठी ग्राहकांच्या मासिक व टॉप-अप गरजांची पूर्तता केले जात असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. या स्टोअरतर्फे ग्राहकांना तीन तासांमध्ये ‘एक्सप्रेस डिलेव्हरी’ सुविधा ५ किलोमीटर परिघात राहणाऱ्या ग्राहकांकरिता लागू केली आहे. स्टार मार्केट १५ हजार चौरस फूटामध्ये असून शुभारंभाचा भाग म्हणून मोठय़ा प्रमाणातील निवडक उत्पादनांच्या किमान किंमतीत किमान १० टक्के सवलत ग्राहकांना दिली आहे.
मदर्स रेसिपीही आता ऑनलाईन
मुंबई : ई प्लॅटफॉर्म वर वेगाने होणाऱ्या किराणा मालाची खरेदी लक्षात घेऊन मदर्स रेसिपी (देसाई ब्रदर्स लिमिटेड – फूड डिव्हिजनचा एक भाग) असलेल्या कंपनीने त्यांचे ई स्टोअर ऑनलाईन मंचावर उपलब्ध करून दिले आहे. यानिमित्ताने देसाई ब्रदर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक संजय देसाई यांनी सांगितले की, यामुळे ग्राहकांना मदर्स रेसिपीची स्थानिक उत्पादने एका ठिकाणी उपलब्ध होतील. ही उत्पादने स्पील प्रुफ आणि वाहून नेण्यास सोप्या अशा पाऊचमध्ये उपलब्ध असल्याने वाहून नेणे आणि पोच करणे सोपे जाते. कंपनीतर्फे पुण्यातील एकात्मिक साठवणुकीच्या उपयोगातून ही उत्पादने देशभरात सात दिवसांच्या आत पाठवेल.

प्लेविनचे ९ कोटींचे विजेते सन्मानित
मुंबई : मुंबईत झालेल्या एका सोहळ्यामध्ये प्लेविनने जॅकपॉट विजेत्यांना ९ कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे धनादेश देऊ केले. पॅन इंडिया नेटवर्क लि.चे अध्यक्ष राहुल टांग्री आणि बॉलिवूडची लावण्यवती मलायका अरोरा – खान यांनी जॅकपॉट जिंकलेल्या गिरीश पटेल यांना ३.५६ कोटी रुपयांचा, अनिल देवळीवर यांना २.६४ कोटी रुपयांचा आणि विश्वास भूषण गौर यांना २.१९ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. अन्य तीन विजेत्यांना एकूण ७२ लाख रुपयांच्या रक्कमेच्या धनादेशांचे वाटपही यावेळी करण्यात आले.

‘मिसकॉल’वर निधी हस्तांतरण सेवा
मुंबई : ‘मिस कॉल’च्या साहाय्याने निधीचे हस्तांतरण करण्याची सुविधा फेडरल बँकेने जाहीर केली आहे. फेडरल बँकेचे खातेदार आणि इतर बँकांचे खातेदार अशा दोहोंनाही नोंदणी करून एका मिसकॉलवर निधी हस्तांतरणासाठीची सेवा आणि तिचे फायदे प्राप्त करता येतील. या सेवेच्या प्रारंभाच्या निमित्ताने फेडरल बँकेच्या डिजिटल बँकिंगचे विभागाचे प्रमुख के. ए. बाबू म्हणाले, या सेवेसाठी स्मार्ट फोन किंवा तत्सम अत्याधुनिक उपकरण असणे बंधनकारक नाही. कुठल्याही प्रकारच्या मोबाइल फोनद्वारे हे करता येते. दिवसाला ५ हजार रुपयांपर्यंत आणि महिन्याला २५ हजार रुपयांपर्यंत हस्तांतरणाची मर्यादा असेल. ही सेवा विनामूल्य आहे.