अमेरिकन फेडरल रिझव्र्ह रोखे खरेदी उपक्रम आणखी संकुचित करण्याच्या भीतीला चीनमधील घसरत्या निर्मिती आकडय़ाची जोड मिळाल्याने मुंबई शेअर बाजाराने गुरुवारी गेल्या पाच व्यवहारांत प्रथमच घसरण नोंदविली. एकाच दिवसात १८६.३३ अंश घसरणीसह सेन्सेक्स २०,५३६.६४ पर्यंत खाली आला. निफ्टीतही ६१.३० अंश घट झाल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराचा हा प्रमुख निर्देशांक ६,०९१.४५ वर येऊन ठेपला.
गेल्या सलग चार सत्रांत सेन्सेक्स ५३० अंशांनी झेपावला आहे. असे करताना तो गेल्या महिन्याभराच्या उच्चांकावर पोहोचला होता. बाजाराने गुरुवारच्या सत्राची सुरुवातच ८३ अंशांच्या नकारात्मक कामगिरीने केली. सेन्सेक्स या वेळी २०,६३९.५५ वर होता. अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हच्या जानेवारीतील बैठकीत अर्थउपाययोजना कपात करण्याच्या बाजूची धोरणे प्रदर्शित करणारी माहिती बुधवारी उशिरा जाहीर झाली. त्यातच एचएसबीसीने चीनमधील जानेवारीतील निर्मिती ४०.३० टक्क्यांपर्यंत घसरल्याचे स्पष्ट केले. एकूणच आशियाई बाजारही २.१ टक्क्यांपर्यंत आपटले होते.
यामुळे मुंबईच्या शेअर बाजारात बँक, पोलाद, तेल व वायू क्षेत्रातील कंपनी समभागांचा विक्रीचा मारा सुरू ठेवला. सेन्सेक्समधील घसरलेल्या २४ समभागांमध्ये बुधवारच्या व्यवहारात महिन्याच्या उच्चांकाला मूल्य पोहोचलेल्या आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, टाटा स्टील यांचा समावेश राहिला. तर केवळ डॉ. रेड्डीज, बजाज ऑटोसह सहा समभाग वधारले. १.६३ टक्क्यांसह बँक निर्देशांक घसरणीत आघाडीवर राहिला. गेल्या सलग चार व्यवहारांत १५० अंशांची भर नोंदविणारा निफ्टीही आता ६,१०० च्या खाली विसावला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2014 रोजी प्रकाशित
सेन्सेक्सची गटांगळी
अमेरिकन फेडरल रिझव्र्ह रोखे खरेदी उपक्रम आणखी संकुचित करण्याच्या भीतीला चीनमधील घसरत्या निर्मिती आकडय़ाची जोड मिळाल्याने मुंबई शेअर बाजाराने गुरुवारी गेल्या पाच व्यवहारांत प्रथमच घसरण नोंदविली.
First published on: 21-02-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex halted a four day rally on thursday to close 186 points lower