मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८ हजार तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,३५० अशा अभूतपूर्व टप्प्यापर्यंत बुधवारी गेले. देशांतर्गत मोदी सरकारचा आर्थिक सुधारणांच्या मार्गावरील दमदार वाटचाल, आंतरराष्ट्रीय स्तरावर जपानमधील आर्थिक उत्तेजनाचा कार्यक्रम, घसरलेले कच्च्या तेलाचे दर, शिवाय रिझव्र्ह बँकेकडून व्याजदर कपातीबाबत वाढलेला आशावाद या गोष्टी निर्देशांकांच्या उधाणास कारणीभूत ठरल्या. दिवसअखेर निर्देशांकांनी त्यांच्या दिवसातील उच्चांकांपासून माघार घेतली असली तरी दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी आपापले ऐतिहासिक उच्चांकी कळस मात्र कायम ठेवले.
आर्थिक चर्चेवरील नवी दिल्लीतील व्यासपीठावरून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वित्त सुधारणा कार्यक्रमांच्या घोषणांची भर टाकल्याने व्यवहारात भांडवली बाजार अधिकच उंचावला. असे करताना सेन्सेक्सने २८ हजारापुढील, २८,०१०.३९ पर्यंतची कामगिरी बजाविली. तर निफ्टीने ८,३५० हा स्तर ओलांडत, ८,३६५.५५ वर मजल मारली.
सत्रअखेरही तेजीसह करताना सेन्सेक्स सोमवारच्या तुलनेत ५५.५० अंशांनी वधारत २७,९१५.८८ वर तर निफ्टी १४.१५ अंशांनी वाढून ८,३५०.६० वर बंद झाला. व्यवहारातील अनोख्या टप्प्यापासून दोन्ही निर्देशांक माघारी फिरले असले तरी नवा ऐतिहासिक उच्चांक मात्र त्यांनी राखला.
गुरू नानक जयंतीनिमित्ताने भांडवली बाजार गुरुवारी बंद राहणार आहेत. मंगळवारीही मोहरममुळे बाजारात व्यवहार झाले नाहीत. सोमवारच्या सलग चौथ्या सत्रातील तेजीनंतर बुधवारचे बाजारातील व्यवहार हे आर्थिक सुधारणांच्या घोषणांच्या स्वागतावर झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर चार वर्षांच्या तळात आल्याची जोड तसेच रिझव्र्ह बँकेकडून व्याजदर कपातीच्या आशेने बाजारात समभागांची अधिक खरेदी झाली. त्यातही माहिती तंत्रज्ञान, बँक, तेल व वायू क्षेत्रातील समभागांचे मूल्य तुलनेत रुंदावले.
२८ हजारांनजीकचा व्यवहारातील सर्वोच्च स्तर सेन्सेक्सने सोमवारीच, ३ नोव्हेंबर रोजी २७, ९६९.८२ असा राखला होता. तर त्याचा यापूर्वीच सर्वोच्च बंदही २७,८६५.८३ हा गेल्याच सप्ताहात, ३१ ऑक्टोबर रोजी होता.
विक्रमी प्रवासात सेन्सेक्समधील १४ समभाग वधारले. त्यात अर्थातच बँक समभाग आघाडीवर होते. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही १.४१ टक्क्यासह बँक निर्देशांकाचीच सरशी होती. दरम्यान, लूप मोबाइल खरेदीचा व्यवहार संपुष्टात आणणाऱ्या भारती एअरटेलचा समभाग मात्र सेन्सेक्स दफ्तरी ३ टक्क्यांपर्यंत आपटला.