दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात उत्साह
निर्देशांकाचा उच्चांक; सोन्याच्या दरात नरमाई
२१,१९६ निर्देशांक
आर्थिक मंदी, कमी उत्पादन निर्मिती, रोजगारातील अस्थिरता, वाढते इंधन आणि व्याजदर, कांद्याच्या दराने डोळ्यात आणलेले महागाईचे पाणी, सोन्याच्या हव्यासावर लादलेल्या मर्यादा, सुमार निकालापोटी खालावलेले कंपन्यांचे समभाग मूल्य अशा साऱ्या नकारात्मक वातावरणाच्या उंबरठय़ावर यंदाच्या दिवाळीने आशेचे, उत्साहाचे दीप शुक्रवारी लावले. सोन्याच्या दरात अनेक दिवसांनी आलेल्या दरांच्या नरमाईने खरेदीदारांच्या उत्साहाला उधाण आले आणि खऱ्या अर्थाने धनत्रयोदशी साजरी झाली.
अतिउत्साह.. तरी सावध
भांडवली बाजारातील प्रतिसादाला ‘अतिउत्साहा’ची उपमा देणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गुंतवणूकदारांना काहीसे सावध केले. तरीदेखील देशाचा आगामी प्रवास गुंतवणूकपूरक वातावरणाचा असेल, अशा शब्दात त्यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तमाम अर्थव्यवस्थेसाठी असलेली चालू खात्याच्या रूपातील चिंता वाढत्या निर्यातीमुळे आणि कमी आयातीमुळे काहीशी शिथिल होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत हौशी खरेदीदारांनी तोळ्यासाठी  २०० रुपयांनी कमी झालेल्या सोन्याच्या दरातील घसरणीचा लाभ उठविला. सोन्याला ३१,५१० रुपयांचा भाव मिळाला. चांदीही किलोसाठी ५० हजारांच्या आत विसावत शुक्रवारी एकदम ६६५ रुपयांनी कमी झाली.
लक्ष्मीचे प्रतीक मानला जाणारा देशाचा भांडवली बाजार २०६९ संवतची अखेर करताना नव्या उच्चांकावर विराजमान झाला. मावळत्या संवताला निरोप देताना गुंतवणूकदारांनी मुंबईच्या शेअर बाजारात शुक्रवारी जोरदार खरेदी करत सेन्सेक्सला २१,१९६.८१ या सार्वकालिक उच्चांकावर नेऊन ठेवले. सलग तिसऱ्या सत्रात विक्रमाची हॅट्ट्रिक करणाऱ्या मुंबई निर्देशांकाने शुक्रवारी २००८ मधील व्यवहारातील २१,२०६.७७ हा सर्वोच्च स्तरालादेखील मागे टाकले. २०६८ संवताचा अखेरचा दिवस १२ नोव्हेंबर २०१२ रोजी होता. सेन्सेक्स १८,६७०.३४ वर बंद झाला. हिंदू वर्षतुलनेत सेन्सेक्स १३.५ टक्क्यांनी म्हणजेच २,५२६.४७ अंशांनी उंचावला आहे. तर या कालावधीत गुंतवणूकदार ६८.७८ लाख कोटींचे धनी झाले.