पायाभूत सुविधा, विकास या क्षेत्रात वर्षांनुवर्षे आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राला बिहारसारख्या एकेकाळच्या मागास राज्याकडून आव्हान मिळू लागले आहे. आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी राज्याच्या राज्यकर्त्यांसाठी निश्चितच विचार करण्यास लावणारी आहे.
बिहारचे राज्य सकल उत्पन्न १५.१ टक्क्यांवर गेले. मध्य प्रदेशने चांगली  प्रगती केली. गुजरात आणि केरळ राज्यांनी विकासाच्या क्षेत्रात समाधानकारक प्रगती केली आहे. राज्य सकल उत्पन्नाची महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांची सरासरी अव्वल क्रमाकांवर असली तरी अन्य राज्यांकडून महाराष्ट्राच्या अव्वल स्थानाला आव्हान दिले जात आहे. शिक्षण क्षेत्रातही राज्याचा कोठेच उल्लेख आढळत नाही.
गरिबी हटाव, आरोग्य, बेरोजगार या क्षेत्रांत राज्याचे चित्र फारसे काही समाधानकारक नाही. साक्षरतेमध्ये दर १०० माणसी राज्यातील प्रमाण ८२.३ टक्के आहे, तर केरळमध्ये हेच प्रमाण ९४ आहे. विशेष म्हणजे लक्षदिप, अंदमान आणि निकोबार, गोवा, दिल्ली, मिझोराम, त्रिपुरा, पुंडुंचिरी या छोटय़ा राज्यांनी चांगली प्रगती केली आहे.