गेल्या सलग दोन दिवसांतील तेजीपासून माघार घेत सेन्सेक्सने गुरुवारी जवळपास शतकी निर्देशांक घसरण नोंदविली. चिनी भांडवली बाजारात निर्माण झालेल्या अस्वस्थेवर प्रतिक्रिया देत मुंबई निर्देशांक ९७.४१ अंश घसरणीने २५,६२२.१७ पर्यंत तर निफ्टी ३०.५० अंश नुकसानासह ७,७८८.१० पर्यंत घसरला.

चीनचा ऑगस्टमधील महागाई निर्देशांक उंचावल्याने तेथील प्रमुख बाजारांनी गुरुवारी पुन्हा घसरणीचा फेर धरला. त्यातच आशियातील विकसनशील ब्राझीलचे पतमानांकन स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड पूअर्सने खाली खेचले. या साऱ्याचे सावट येथील बाजारात सकाळच्या सत्रापासूनच उमटले. व्यवहारातील डॉलरच्या तुलनेतील रुपयाची भक्कमता निर्देशांकाला त्याच्या दिवसाच्या तळातून बाहेर काढण्यास साहाय्यकारी ठरली. मात्र दिवसअखेर त्यात घसरणच नोंदली गेली. या रूपात गेल्या दोन व्यवहारांत ८२५.७७ अंश नोंदविलेली वाढही थांबली. वस्तू व सेवा कर प्रस्तावाला पुढे नेणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची अनिश्चितताही गुंतवणूकदारांसाठी काळजीची बाब ठरली.
मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये संमिश्र हालचाल नोंदली गेली. तर सेन्सेक्समधील एचडीएफसी, ओएनजीसी, स्टेट बँक, विप्रो, डॉ. रेड्डीज, हिंदुस्थान यूनिलिव्हर यांचे समभाग घसरले. सेन्सेक्समधील २१ समभाग घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक सर्वाधिक घसरला. त्याचबरोबर पोलाद, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांनाही कमी मागणी राहिली.
शुक्रवारी जाहीर होणाऱ्या जुलैमधील औद्योगिक उत्पादन दर व ऑगस्टमधील ग्राहक किंमत निर्देशांक यावर भांडवली बाजार सप्ताहअखेर प्रतिक्रिया नोंदविण्याची शक्यता आहे.

ल्ल ब्राझीलशी निगडित समभागांची आपटी
पतमानांकन कमी झालेल्या ब्राझीलमध्ये व्यवसाय असलेल्या तसेच या देशात मोठी निर्यात असलेल्या कंपन्यांचे समभाग मूल्य गुरुवारी भारतीय भांडवली बाजारात कमालीचे आपटले. आशियातील निक्केईने ७ टक्क्यांच्या रूपात बुधवारच्या सत्रात २००८ नंतरची सर्वात मोठी आपटी नोंदविल्यानंतर आशियातील ब्राझीलमध्येही अस्वस्थता पसरली आहे. स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड पूअर्स या पतमानांकन संस्थेने त्या देशाचे पतमानांकन खाली खेचले आहे. परिणामी, टोरंट फार्मा (४.८३%), हेवल्स (२.६६%) ग्लेनमार्क (१.५९%), ल्युपिन (०.७८%), केईसी इंटरनॅशनल (०.३६%), कॅडिला हेल्थकेअर (०.३१%), श्री रेणुका शुगर्स (०.२७%) यांचे समभाग मूल्य रोडावले.