चालू खात्यातील वाढत्या तुटीसाठी जबाबदार असलेल्या सोने धातूच्या वापरावर वेळोवेळी र्निबध लादूनही भारतीयांचा हव्यास कमी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरलेल्या तिमाहीत म्हणजे ऐन लग्नादी मोसमात भारतीयांकडून सोन्याचा वापर ३१० टन नोंदला गेला असून गेल्या दशकभरातील हा उच्चांक आहे.
‘जागतिक सुवर्ण परिषदे’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून या कालावधीत भारतात ३१० टन सोन्याची मागणी नोंदविली गेली. या दरम्यान सोन्याच्या वापरावरील र्निबध असूनही जूनमध्ये लग्न हंगामालाच धातूच्या किमती कमी झाल्याने ही वाढ राखली गेल्याचे स्पष्ट होते.
गेल्या वर्षांच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा सोन्याची मागणी ७१ टक्क्यांनी वाढली आहे. सोन्याच्या दागिन्यांची मागणी या दरम्यान ५० टक्क्यांनी वाढून वर्षभरापूर्वीच्या १२४ टनांवरून १८८ टन झाली आहे, तर सोन्याचे बार व नाणी यांची मागणी विक्रमी अशा १२२ टनावर पोहोचली आहे.
जानेवारी २०१३पासून आयात शुल्क वाढून ६ टक्क्यांवर गेले असले तरी एप्रिलमध्ये सोन्याचे दर खाली आले होते. तसेच मौल्यवान धातूच्या वापरावरील प्रत्यक्ष र्निबध मेपासून लागू झाले. यानंतर जूनमध्ये पुन्हा शुल्क वाढून ते ८ टक्के करण्यात आले. कच्च्या तेलानंतर भारतासाठी सोने ही दुसरी मोठी आयात होणारी वस्तू आहे. याच आठवडय़ात शुल्क वर्षभरात तिसऱ्यांदा वाढविताना ते थेट १० टक्के करण्यात आले.
दागिने, वळे, बार आदी स्वरूपातील २० हजार कोटी रुपयांचे मौल्यवान धातू भारतीयांच्या घराघरांमध्ये असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी ‘रत्न व दागिने निर्यात प्रोत्साहन संघटने’ने केला होता. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सोन्याची मागणी तुलनेने स्थिर राहणार असून सण तसेच लग्नाच्या मोसमामुळे पुन्हा ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत ती वाढण्याची शक्यता परिषदेने व्यक्त केली आहे.
वाढते आयात शुल्क तसेच आयातीवरील बंधने या उपाययोजना चालू खात्यातील तूट रोखण्यास उपकारक ठरण्याबाबत शंका असून तूट रोखण्यासाठी सरकारने दीर्घकालीन पावले उचलण्याची गरज असल्याचे परिषदेचे प्रतिपादन आहे. भारत तसेच चीन या दोन बडय़ा ग्राहक देशांमध्ये सोन्याची मागणी ९०० ते १,००० टन राहील. जागतिक सोने मागणीत उभय देशांचा एकत्रित हिस्सा तब्बल ६० टक्के आहे.
सोने मागणीत चीनची सरशी
मौल्यवान धातूसाठी मोठा ग्राहक असलेल्या भारत व चीन हे शेजारचे देश आघाडीवर असून वर्षअखेपर्यंत तो भारतावर याबाबत मात करेल, असे ‘जागतिक सुवर्ण परिषदे’ने म्हटले आहे. २०१३ मधील पहिल्या सहा महिन्यांत भारताने सोन्याचा वापर ५६६.५ टनपर्यंत केला आहे, तर चीनमधील या कालावधीतील मागणी ५७० टन नोंदली गेली आहे. चालू खात्यातील वाढत्या वित्तीय तुटीबाबत सोने-चांदीच्या वापरावरील सध्याचे र्निबध पाहता चीन हा देश सोने मागणीत भारताच्या पुढे जाईल.
‘पितांबरी’चा सावधानतेचा इशारा
मुंबई : सोने चमकविणाऱ्या उत्पादनासाठी आपल्या नाममुद्रेचा बेकायदा वापर काही विक्रेत्यांमार्फत केला जात असल्याचा ‘पितांबरी’ने दावा केला आहे. कंपनीच्या उत्पादनांना ग्राहकांमध्ये विश्वासाचे स्थान प्राप्त झाल्याने अशी नक्कल व लुबाडणूक होत असल्याचे डोंबिवली परिसरातील घटनांचा हवाला देत कंपनीने म्हटले आहे. आपण असे कोणतेही उत्पादन तयार करत नाही, असे ‘पितांबरी’ने स्पष्ट केले आहे. सोन्याच्या लकाकीच्या या प्रयत्नांतून प्रत्यक्षात मौल्यवान धातू घटल्याचे डोंबिवलीत निदर्शनास आले आहे.