वृत्तसंस्था, नवी दिल्ली : आशियातील धनाढय़ उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने विमानतळ, बंदरे, खाणकाम, माध्यम ते ऊर्जा अशा विविध क्षेत्रांमध्ये आक्रमकपणे विस्तार सुरू ठेवला आहे. मात्र त्यांचा हा विस्तार भागभांडवलापेक्षा किती तरी अधिक बँका व वित्तसंस्थांकडून कर्जाऊ उचललेल्या पैशावरच सुरू आहे. भांडवली बाजारात सूचिबद्ध या समूहातील सातही कंपन्यांवरील कर्जाचा डोंगर याचा प्रत्यय देतो.
अदानी ग्रीन एनर्जीचे कर्ज-भांडवल गुणोत्तर तर २,०२१ टक्क्यांवर पोहोचले आहे. म्हणजेच कंपनीत प्रवर्तकांनी गुंतविलेल्या भांडवलाच्या २०० पटींहून अधिक तिचे एकूण कर्जदायित्व आहे. आशियामधील आघाडीच्या ८९२ सूचिबद्ध कंपन्यांपैकी चीनमधील दातांग हुआयिन इलेक्ट्रिक पॉवर कंपनीचे कर्ज-भांडवल गुणोत्तर सध्या सर्वाधिक २,४५२ टक्के आहे. त्यापाठोपाठ अदानी ग्रीन एनर्जी दुसऱ्या क्रमांकावर आहे, असे ब्लूमबर्गने संकलित केलेली आकडेवारी सांगते. उल्लेखनीय म्हणजे अदानी ग्रीन एनर्जी ही अदानी समूहातील सर्वाधिक नफा मिळवून देणारी कंपनी आहे.
अदानी समूह देशामध्ये विविध क्षेत्रांमध्ये आक्रमकपणे विस्तार योजना आखत आहे. गेल्या वर्षभरात अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांनी भांडवली बाजारात केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर अदानी यांची मालमत्ता १३५ अब्ज डॉलरवर पोहोचली असून त्यांनी आशियातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळविले आहे. मात्र व्यवसाय विस्तारासाठी मोठय़ा प्रमाणावर कर्जाचा वापर अदानी समूह करीत आहे, याकडे निर्देश करीत तीन दिवसांपूर्वी पतमानांकन संस्था ‘फिच’च्या अहवालाने अदानी समूहातील व्यवसायाचे वर्णन ‘डीपली ओव्हरलिव्हरेज्ड’ असे केले आहे.
अति महत्वाकांक्षी कर्ज-साहाय्यित विकास योजना अखेरीस भयानक कर्जसापळय़ाचे रूप घेऊ शकते. केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी जोवर चांगले संबंध आहेत, तोपर्यंत धोकाही नाही. मात्र परिस्थिती बिघडल्यास समूहातील एक किंवा अधिक कंपन्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिल, असा नि:संदिग्ध इशाराच ‘फिच’ने दिला आहे.
‘एनडीटीव्ही’च्या अधिग्रहणाच्या घोषणेच्या दिवशी हा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला आणि बुधवारच्या सत्रात बाजारात त्यावर प्रतिक्रिया म्हणून अदानी समूहातील बहुतांश कंपन्यांच्या समभागांमध्ये ५ टक्क्यांची घसरण झाली. गुरुवारच्या सत्रात मात्र कंपन्यांच्या समभागात पुन्हा सुधारणा दिसून आली. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) गुरुवारी अदानी ग्रीन एनर्जीचा समभाग २,३६६.६० रुपयांवर बंद झाला.
समूहाची ‘पत’ धोक्यात : एस अँड पी
नवी दिल्ली : अदानी समूहाचे कर्जाधारित ताबा व अधिग्रहणांचा सपाटा हा पुढे जाऊन जोखीमयुक्त बनून त्यातून या समूहाचे पतमानांकन धोक्यात येऊ शकेल, असे जागतिक पतमानांकन संस्था ‘एस अँड पी’ने गुरुवारी स्पष्ट केले. अलीकडेच होल्सिम या स्विस कंपनीचे १०.५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या मोबदल्यात संपादनासह सिमेंट क्षेत्रात उतरलेला, अदानी समूह सध्या ‘एनडीटीव्ही’च्या अधिग्रहणासह माध्यम क्षेत्रात विस्ताराच्या मोहिमेवर आहे. हा विस्तार बहुतांश कर्जातून मिळविलेल्या निधीतून सुरू आहे. नवीन विस्तार व क्षमतेत वाढ यासाठी अधिक निधी लागेल आणि विशिष्ट उद्योग समूहाला बँका अथवा वित्तीय संस्थांना ठरावीक मर्यादेत पतपुरवठय़ाचा नियम लागू झाल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होईल, असे या संस्थेने अहवालात म्हटले आहे.
कर्ज- भांडवल गुणोत्तर म्हणजे काय?
कर्ज- भांडवल गुणोत्तर म्हणजे कंपनीत गुंतलेल्या भांडवलाच्या तुलनेत कंपनीने घेतलेल्या कर्जाचे प्रमाण होय. कंपनीने कर्ज घेतल्यावर त्यावर व्याज द्यावे लागते. परिणामी व्याजखर्चामुळे कंपनीच्या नफाक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे खर्च वाढत जाऊन नफा कमी होत जातो. भविष्यात प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास भांडवलातून कर्जाची भरपाई केली जाऊ शकते का? हेदेखील यावरून समजते. कंपनीच्या समभागात गुंतवणूक करताना त्यातील जोखीम समजून घेण्यासाठी हे गुणोत्तर कमाल दोन-अडीच पटींच्या मर्यादेत आहे, हे पाहिले जाते. अदानींच्या कंपन्यांच्या बाबतीत तो यापेक्षा कितीतरी जास्त आहे.
अदानी समूहातील सूचिबद्ध कंपन्या कोणत्या?
- अदानी ग्रीन एनर्जी
- अदानी टोटल गॅस
- अदानी विल्मर,
- अदानी ट्रान्समिशन
- अदानी पोर्ट्स,
- अदानी इंटरप्रायझेस
- अदानी पॉवर