मुंबई : भारतीय भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने शुक्रवारी सलग सहाव्या सत्रात जागतिक बाजारातील पडझडीचे अनुकरण करीत लोळण घेतली. जगभरात मध्यवर्ती बँकांनी महागाईला लगाम घालण्यासाठी व्याजदरात तीव्र स्वरूपाची वाढ केल्याची परिणती ही आर्थिक मंदीकडे नेणारी ठरेल, अशा भीतीने गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा सुरू राहिला.

अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदरात केलेल्या पाऊण टक्क्यांच्या वाढीचा परिणाम म्हणून जगभरातील भांडवली बाजारात मोठय़ा प्रमाणावर पडझड झाली. त्या पडझडीने मंदीवाल्यांना अधिक बळ मिळाल्याने सप्ताहाखेर सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी गत ५२ आठवडय़ांतील नवीन नीचांकी पातळी गाठली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांसाठी सलग सहावे सत्र नुकसानीचे राहिले आणि त्यांनी नोंदविलेला हा सलग दुसरा साप्ताहिक तोटा ठरला. साप्ताहिक आधारावर, सेन्सेक्स २,९४३ अंश अर्थात ५.४१ टक्क्यांनी घसरला; तर निफ्टी ९०८ अंशांनी म्हणजेच ५.९३ टक्क्यांनी गडगडला.

जागतिक पातळीवरील नकारात्मकता, खनिज तेलाचे वाढलेले दर आणि परदेशी निधीचे अखंडितपणे सुरू असलेले निर्गमन यामुळे झालेल्या घसरणीत, शुक्रवारी दिवसअखेर सेन्सेक्स १३५.३७ अंशांच्या तोटय़ासह ५१,३६०.४२ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ५७४.५७ अंश गमावत ५०,९२१.२२ ही ५२ आठवडय़ातील नवीन नीचांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराची निर्देशांक निफ्टीमध्ये देखील ६७.१० अंशांची घसरण झाली आणि तो १५,२९३.५० पातळीवर स्थिरावला. निफ्टीने देखील १५,१८३.४० ही ५२ आठवडय़ातील नीचांकी पातळी गाठली.

वाढती चलनवाढ आणि त्यावर उपाय म्हणून जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून आक्रमकपणे व्याज दरवाढीचे धोरण अवलंबिले जात आहे. यामुळे जागतिक महामंदीची शक्यता कमी झाली आहे. आगामी काळात देखील मध्यवर्ती बँकांकडून व्याज दरवाढीचे संकेत येत असल्यामुळे परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा कायम राहण्याची शक्यता आहे.

देशांतर्गत भांडवली बाजारात नजीकच्या काळात अस्थिर वातावरण कायम राहणार आहे, अशा वेळी गुंतवणूकदारांनी मध्यम ते दीर्घकालीन दृष्टिकोन कायम ठेवून चोखंदळ खरेदी करावी, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले. सेन्सेक्समध्ये टायटन, विप्रो, डॉ रेड्डीज, एशियन पेंट्स, सन फार्मा, पॉवर ग्रीड, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, टीसीएस आणि हिंदुस्थान युनिलिव्हरच्या समभागात सर्वाधिक घसरण नोंदवली गेली. तर दुसरीकडे बजाज फायनान्स, बजाज फिनसव्‍‌र्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग तेजी दर्शवित स्थिरावले.

‘पेटीएम’ला विजय शेखर शर्मा यांच्याकडून खरेदीचे पाठबळ

डिजिटल देयक व्यासपीठ ‘पेटीएम’ची प्रवर्तक वन ९७ कम्युनिकेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक विजय शेखर शर्मा यांनी सरलेल्या महिन्यात ३० आणि ३१ मे रोजी पेटीएमचे खुल्या बाजारातून एकूण सुमारे १.७० लाख समभाग खरेदी केले आहेत. सेबीच्या नियमानुसार, पेटीएमच्या प्रारंभिक समभाग विक्रीत (आयपीओ) प्रवर्तक या नात्याने शर्मा यांनी हिस्सा विक्री केली असल्यामुळे आयपीओपश्चात सहा महिन्यांपर्यंत त्यांना पेटीएमचे समभाग खरेदी करता येत नव्हते. मात्र सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर शर्मा यांनी हे समभाग खरेदी केले आहेत. भागविक्रीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी २,१५० रुपयांना मिळविलेल्या समभागाने सहा महिन्यांत ५११ रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात पेटीएमचा समभाग १६.१० रुपयांच्या वाढीसह ६२९.१० रुपयांवर बंद झाला.