मुंबई : नियम पालनातील त्रुटींसाठी चार सहकारी बँकांना एकूण चार लाख रुपयांचा दंड ठोठावणारी कारवाई रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी केली. कारवाई झालेल्या चारपैकी तीन बँका महाराष्ट्रातील आहेत.

नाशिक जिल्ह्यातील अंदरसुल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, अंदरसुल या बँकेवर १.५० लाख रुपयांचा, तर लातूर जिल्ह्यातील महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, अहमदपूर, या बँकेवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, नांदेड मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक, नांदेडला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या तिन्ही बँकांनी, संचालक मंडळाची भूमिका आणि नागरी सहकारी बँकांना लागू वैधानिक/इतर निर्बंध या संबंधाने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंडाला सामोरे जावे लागल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे.

कारवाई झालेली चौथी बँक मध्य प्रदेशातील असून, ‘केवायसी’संबंधी निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ‘जिला सहकारी केंद्रीय बँक मर्यादित, शहाडोल’वर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

हा दंड नियम पालनात दिसलेल्या हयगयीसाठी असल्याचे मध्यवर्ती बँकेने चार स्वतंत्र नोटिसांद्वारे स्पष्ट केले. या कारवाईमुळे संबंधित बँकांचे त्यांच्या ग्राहकांसोबतच्या कोणत्याही व्यवहार आणि त्याच्या वैधतेवर परिणाम संभवत नाही, असेही तिने सूचित केले आहे.