चालू वर्षांच्या पहिल्या तिमाहीत सोने आयात कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नात यश आले असून जानेवारी ते मार्च या कालावधीत मौल्यवान धातूची आयात वार्षिक तुलनेत ५.७ टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र या कालावधीत दागिन्यांसह सोन्याची मागणी व गुंतवणूक मात्र वाढली आहे.
जानेवारी – मार्च २०१२ मध्ये सोन्याची आयात आणि मागणी अनुक्रमे २२८ आणि २०२ टन होती. २०१३ मधील जानेवारी ते मार्च या कालावधीत आयात २१५ टन आणि मागणी २५६.५ टन नोंदली गेली आहे. आयातीतील घसरण ५.७ टक्के तर मागणीतील देशाची वृद्धी २७ टक्क्यांची आहे.
मौल्यवान धातूची मागणी आगामी कालावधीत कायम असेल, असे जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे. सोन्यावरील आयात शुल्क वधारणेच्या भीतीने गेल्या तिमाहीत सोन्याची आयात घसरल्याचे परिषदेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक पी. आर. सोमसुन्दरम यांनी म्हटले आहे. तुलनेत २०१३ च्या पहिल्या तिमाहीत देशातील दागिन्यांची मागणी मात्र १५ टक्क्यांनी वधारून १५९.५ टन झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत दागिन्यांची मागणी १२८.३ टन नोंदली गेली होती. सोन्यामधील गुंतवणुकीचे प्रमाण वार्षिक तुलनेत तब्बल ५२ टक्क्यांनी वाढले असून वजनामध्ये ९७ टन सोन्यामघ्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. मौल्यवान धातूतील कमी होत असलेले दर पाहता गुंतवणूक वाढली असल्याचेही सोमसुन्दरम यांनी म्हटले आहे. अद्यापही धातूच्या किमती कमी असल्याने तसेच यंदा लग्नाचा मोसम असल्याने एप्रिल ते जून या दुसऱ्या तिमाहीतही मागणी वाढेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
चमक फिकी
मौल्यवान धातूच्या दरातील चमक दिवसेंदिवस फिकी पडू लागली आहे. गुरुपुष्यामृतचा शेवटचा योग असूनही स्टॅन्डर्ड सोन्याचा भाव गुरुवारी मुंबई सराफ बाजारात तोळ्यामागे थेट ५५० रुपयांनी घसरला. गेल्या दोन सत्रात सोन्याचे भाव तब्बल ८०० रुपयांहून अधिक घसरल्याने सोने आता १० ग्रॅमसाठी २६ हजार रुपयांनजीक आहे. तर चांदीचा दरही गेल्या दोन दिवसात किलोमागे १,३९५ रुपयांनी कमी झाले आहेत. चांदी थेट आता ४४,५०० रुपयांपर्यंत येऊन ठेपली आहे. बुधवारी एकाच सत्रात सोने दराने २०१३ मधील दुसरी मोठी घसरण नोंदविली होती.