रिझव्‍‌र्ह बँकेकडून झालेली दरकपात ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पडलेले एक सकारात्मक पाऊल असून यामुळे जनतेच्या हातात अधिक पैसा खुळखुळेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. ग्राहकांना त्यांना हव्या त्या वस्तू खरेदी करण्यासाठी यामुळे अतिरिक्त पैसा उपलब्ध होऊन देशातील गुंतवणूकपूरक वातावरण तयार होण्यासही ते मदतकार ठरेल, असेही अर्थमंत्री म्हणाले.
रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदरकपात करावी यासाठी जेटली यांनी गव्हर्नर डॉ. राजन यांना सतत सूचित केले होते. देशात गुंतवणूकपूरक वातावरण निर्माण करू न शकलेल्या उद्योगाचा भांडवली खर्च कमी व्याजदरामुळे शक्य आहे, अशी अर्थमंत्र्यांची भूमिका होती. याबाबत अर्थमंत्री व गव्हर्नर यांच्या एकाच व्यासपीठावरील बैठकीतही चर्चा झाली होती. मात्र व्याजदरकपातीबाबत उभयतांमध्ये मतभेद असल्याचे वातावरण निर्माण झाले. अखेर गव्हर्नरना पतधोरणापूर्वीच याबाबत निर्णय घ्यावा लागला.
दरकपात पंतप्रधानांमुळेच : जयंत सिन्हा
रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदरकपात करावी असे केंद्रीय अर्थमंत्र्यांचा आग्रह होता, असे चित्र असतानाच गुरुवारी सकाळीच घडलेली आश्चर्यकारक बाब पंतप्रधानांमुळे झाल्याचा दावा अरुण जेटली यांचे सहयोगी मंत्री अर्थात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय नेतृत्वाची शक्तीच रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयामागे असल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे. एका वित्त वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिन्हा हे याचे काही श्रेय जेटली यांना देण्यासही विसरले नाहीत.