खासगी क्षेत्रातील सर्वात मोठय़ा आयसीआयसीआय बँकेने १ लाख कोटी रुपयांची तारण कर्जे वितरित करून, खासगी बँकिंगच्या क्षेत्रात अशी कामगिरी ती पहिली बँक ठरली आहे. गृहकर्ज घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी अधिक सोयीची व गतिमान प्रक्रिया राबवून बँकेला येत्या काळात त्यात आणखी वाढीची अपेक्षा आहे.
आयसीआयसीआय बँकेने शुक्रवारी दोन नवीन डिजिटल सेवा प्रक्रियांची घोषणा केली. यातून अल्पकाळात कर्जमंजुरी व कर्ज वितरणाची प्रक्रिया पूर्ण करून बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पात घर घेऊ इच्छिणाऱ्यांना कर्ज मिळविता येईल.
‘एक्स्प्रेस होम लोन’ असे नामाकरण करण्यात आलेल्या या योजनेत, ग्राहकाला बँकेच्या शाखेला भेट न देता, संपूर्णपणे ऑनलाइन कर्जप्राप्ती प्रक्रिया पूर्ण करता येईल. सर्व प्रकारच्या पगारदारांसाठी या नव्या सेवेचा लाभ मिळेल.