मुंबई, जळगाव : करोना साथीचे सावट सरल्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर, दसऱ्याचा मुहूर्त साधत राज्यभरात सर्वत्र सोने खरेदीचा ग्राहकांचा उत्साह दिसून आला. महानगरी मुंबईत दागिने खरेदीत गेल्या वर्षांच्या तुलनेत २० टक्क्यांच्या घरात वाढ दिसली, तर सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावांतील मौल्यवान धातूंच्या मागणीत तब्बल दीड पटीने वाढ दिसून आली.

काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार सुरू होते. गेल्या आठवडय़ात सोन्याचा प्रतितोळा दर ५१ हजारांच्या खाली, तर चांदीचा प्रतिकिलो दर ५७ ते ५८ हजारांपर्यंत होते. गत १० दिवसांत सोने तोळय़ामागे २,००० रुपयांनी, तर चांदीच्या भावात किलोमागे ३,७०० रुपयांची तेजी आली. दसऱ्यानिमित्त दरात वाढ होऊन २४ कॅरेट शुद्ध सोने प्रतितोळा ५२ हजारांवर गेले, तर शुद्ध चांदी प्रतिकिलो ६२ हजारांवर गेली. हे पाहता मुंबई-पुण्याच्या सराफा बाजारात १४ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याने तरुणांना आकर्षित केले आहे.

सोने खरेदी बरोबरच हिऱ्याच्या खरेदीच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. चेन, डिझाइनर नेकलेस, डिझाइनर बांगडय़ा या दागिन्यांची तरुणांकडून विशेष मागणी आहे.

जळगावचा सुवर्ण बाजार देशभरात प्रसिद्ध आहे. येथील सोन्याची शुद्धता आणि व्यवहारातील विश्वासार्हता यामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, दक्षिण भारतातून सातत्याने सोन्याचे चोखंदळ     ग्राहक जळगावात येतात.

यंदा पितृपक्षापासूनच सोने खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सराफांकडून सांगण्यात आले. दसऱ्याचा मुहूर्त साधत गतवर्षांपेक्षा दीडपट अर्थात ५० किलो सोने  विक्री झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गतवर्षी विजयादशमीला सोन्याची ३५ किलोच्या घरात जिल्ह्यात विक्री झाली होती.

दसऱ्यानिमित्त ठुशी, चंदनहार, शाहीहार, टेम्पल ज्वेलरी, राणीहार, चिंचपेटी, कोल्हापुरी साज, बोरमाळ, पुतळी हार, पुतळी चपला हार, चंदनहार, शाहीहार, कोल्हापुरी साज, बोरमाळ यांसह विविध आकर्षक दागिने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोने खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

– कपिल खोंडे, खोंडे ज्वेलर्स, जळगाव</strong>

गेल्या आठवडय़ाभरात दर चार टक्क्यांनी वाढले तरी याचा सोने आणि हिऱ्याच्या आभूषणांच्या खरेदीवर परिणाम दिसून येत नाही. यावर्षी दुष्काळ किंवा अवकाळी पाऊस अशी परिस्थिती नसल्याने यंदा ग्रामीण भागातूनही मागणी चांगली आहे. मागच्या वर्षांपर्यंत लहान दागिन्यांची कमी वजनाची म्हणजेच अंगठय़ा, कानातले यांची खरेदी जास्त होती. पण यावर्षी मोठय़ा आणि अधिक वजनांच्या दागिन्यांची मागणी जास्त आहे.

– अमित मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएनजी अँड सन्स

यंदा दसऱ्याला २२ कॅरेट सोने ४९ हजारांखाली राहणे हे ग्राहकांच्या खरेदीत मोठे योगदान देणारे ठरेल. परिणामी पूर्वी ५० ग्रॅमचे नेकलेस निवडणाऱ्या ग्राहकांचा कल हा १०० ग्रॅमच्या नगाकडे वळलेला आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांमध्येही लोकांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट किमतीचे दागिने खरेदी केली. एकूणच व्यवसाय गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढला आहे.

– सौरभ गाडगीळ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स