इराणच्या अण्वस्त्राबाबतीतील नरमाईने जागतिक अर्थसत्तांनी त्या देशावरील आर्थिक र्निबध सैल केले असले, तरी त्यातून भारताची तेलासाठी इराणवरील मदार घटत जावी, असाच परिणाम संभवणार आहे. इराणच्या ऐतिहासिक सामंजस्यामुळे भारताला त्या देशातून होणाऱ्या तेल आयातीची देणी ही आता दशकभरापूर्वीच्या प्रथेनुसार युरो या चलनातून चुकती करावी लागतील. परिणामी जागतिक र्निबधांविना तेल आयात सोपी झाली असतानाही, प्रत्यक्षात ती आधीच्या वर्षांच्या तुलनेत १५ टक्क्य़ांनी कमी करीत ११ दशलक्ष टनांवर आणण्याचे धोरणच भारताकडून रेटले जाण्याचे संकेत आहेत.
जुलै २०११ मध्ये झालेल्या सामंजस्यानुसार, इराणकडून होणाऱ्या तेल खरेदीचा ५५ टक्के भरणा हा युरो चलनातून अंकारास्थित हाल्क बँकेमार्फत, तर उर्वरित ४५ टक्के भारतीय चलनातून कोलकातास्थित युको बँकेमार्फत केला जात आहे. आयातीसाठी भरणा रुपयातून स्वीकारणारा इराण हा भारताबरोबर परदेश व्यापारात भागीदार असलेला एकमेव देश आहे. पण रविवारच्या ऐतिहासिक सामंजस्याच्या पाश्र्वभूमीवर इराणकडून होणारी तेल खरेदी ही संपूर्णपणे युरोतून करणे भारताला क्रमप्राप्त ठरणार आहे. तथापि २०१३-१४ आर्थिक वर्षांसाठी पूर्वनियोजित ११ दशलक्ष टनापेक्षा अधिक तेल खरेदी इराणकडून केली जाणार नाही असेच संकेत आहेत. गेल्या वर्षी भारतातील विविध तेल कंपन्यांकडून १३.१ दशलक्ष टन इतक कच्चे तेल इराणकडून आयात करण्यात आले होते.
मँगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लि., एस्सार ऑइल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपन्या प्रमुख खरेदीदार होत्या. तथापि आर्थिक र्निबधांमुळे इराणच्या तेलवाहू जहाजांच्या विमा सुरक्षेविषयक अडचणी निर्माण झाल्याने हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने एप्रिल २०१३ पासून इराणकडून तेल खरेदी करणे थांबविले आहे.