आरोग्यनिगा क्षेत्रासाठी अद्ययावत उपकरणांच्या निर्मितीतील १० अब्ज अमेरिकी डॉलर उलाढाल असलेली कंपनी ‘कोव्हिडियन’ने मुंबईचे उपनगर अंधेरी येथे आपले पहिले प्रशिक्षण केंद्र सुरू केले. सध्या कार्यरत वैद्यक व्यावसायिक व चिकित्सकांना अत्याधुनिक प्रक्रिया व तंत्राबाबत अद्ययावत करून नवनवीन तंत्रज्ञान व सामग्रीची माहिती देण्याबरोबरच, राज्यात कार्यरत वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी या दालनाचा वापर होऊ शकेल.
मुंबईतील हे केंद्र कोव्हिडियनचे उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये कार्यरत झालेले तिसरे प्रशिक्षण केंद्र आहे. यापूर्वी शाघांई (चीन) आणि ओसोंग (दक्षिण कोरिया) येथे अशी केंद्रे सुरू झाली आहेत. आपल्या शिक्षण-प्रशिक्षण क्षमतांचा विस्तार करणे हे कोव्हिडियनच्या जागतिक विकास धोरणाचा एक मुख्य अंग असून, मुंबईचे केंद्र त्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास कोव्हिडियनचे अध्यक्ष (उदयोन्मुख बाजारपेठा) ब्रायन किंग यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला. हे केंद्र भारतापुढे आव्हान बनलेल्या हृदयरोग, लठ्ठपणा, टाईप-२ मधुमेह व कर्करोगासारख्या दुर्धर व्याधींवर वैद्यकक्षेत्रासाठी सहाय्यकारी भूमिका बजावेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या केंद्रांयोगे कोव्हिडियनने वैद्यकक्षेत्रात प्रस्तुत केलेल्या अनेक महत्त्वाच्या उपकरण व सामग्रीला जनमानसात ओळख व बाजारपेठही मिळवून दिली जाईल. चालू वर्षांत अशीच केंद्रे इस्तंबूल (तुर्कस्तान), साओ पाऊलो (ब्राझील) या ठिकाणीही सुरू करण्याचा मानस असल्याचे किंग यांनी स्पष्ट केले. कोव्हिडियनच्या सद्य उलाढालीत अमेरिका (५१%), युरोप (२४%) यांचा एक-तृतीयांश वाटा असला तरी जपान, ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडसह आशिया-पॅसिफिक बाजारपेठांचा सध्याचा १९% वाटा हा लवकरच २५% वर नेण्याचे लक्ष्य असल्याचे कोव्हिडियनचे अध्यक्ष (आशियाई विभाग) हॅरी डीविट यांनी सांगितले.