वृत्तसंस्था, नवी दिल्ली : कर्ज घेणे महाग बनविणारे व्याजदर वाढीचे सत्र सुरूच असून, सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँक आणि खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने निधीवर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) वाढीची घोषणा केली. कॅनरा बँकेने ‘एमसीएलआर’संलग्न व्याजदर वाढवून ८.१० टक्क्यांवर नेला आहे. सर्वसाधारणपणे ‘एमसीएलआर’चे दर एक ते तीन वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेले असतात. कॅनरा बँकेने विविध कालावधीच्या कर्जाच्या दरात १५ ते २० आधारबिंदूची वाढ केली आहे. बँकेने एक वर्ष मुदतीचा दर २० आधारबिंदूनी वाढवत ८.१० टक्क्यांवर नेला आहे. तर सहा महिन्यांसाठी कर्जदर ७.८० टक्क्यांवरून वाढवत ८ टक्क्यांवर नेला आहे. तसेच कर्जासाठी रेपो दराशी संलग्न व्याजदरात थेट ०.३० टक्के वाढ बँकेने केली असून तो आता ८.८० टक्के करण्यात आला आहे. नवीन दर सोमवार, ७ नोव्हेंबररपासून लागू करण्यात आले आहेत.
खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेनेदेखील कर्जाच्या दरात ३० आधारबिंदूपर्यंत वाढ केली आहे. सुधारित व्याजदर वाढ सोमवार, ७ नोव्हेंबररपासून लागू करण्यात आला आहे. एचडीएफसी बँकेने संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, एक दिवसांसाठीचा कर्जदर आधीच्या ७.९० टक्क्यांवरून तो ८.२० टक्के असेल. एका महिन्यासाठी तो ७.९० वरून ८.२५ टक्क्यांवर नेला आहे. तीन महिने आणि सहा महिन्यांचा ‘एमसीएलआर’ अनुक्रमे ८.३० टक्के आणि ८.४० टक्के असेल. एक वर्षांसाठीचा कर्जदर आता ८.५५ टक्के करण्यात आला आहे. तीन वर्षांचा कर्जदर ८.४० टक्क्यांवरून ८.७५ टक्क्यांवर नेला आहे. आता पुढील महिन्यात ५ ते ७ डिसेंबरदरम्यान रिझव्र्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार असून मध्यवर्ती बँकेकडून पुन्हा व्याजदर वाढ होण्याची शक्यता आहे.
