‘लोकसत्ता अर्थब्रह्म’कडून ठाणेकरांना शनिवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; वार्षिकांकाचेही प्रकाशन

सेन्सेक्सने २९ हजाराला घातलेली गवसणी, मुंबई शेअर बाजाराने नोंदविलेले विक्रमी बाजार भांडवल, म्युच्युअल फंड उद्योगाची सर्वोच्च मालमत्ता, लग्नसराईच्या पाश्र्वभूमीवर मौल्यवान धातूदरातील उठाव, स्थावर मालमत्तेचे स्थिरावलेले दर अशी अर्थस्थिती असताना बदललेल्या अर्थतरतुदींच्या आधारावर नव्या वित्त वर्षांकडे कसे मार्गक्रमण करावे? या प्रश्नांचे उत्तर ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या निमित्ताने ठाणेकरांना मिळणार आहे. या मंचावर तज्ज्ञ आर्थिक सल्लागार आणि अर्थसंकल्पानंतर प्रकाशित करण्यात आलेला वार्षिकांक यांच्या सहाय्याने गुंतवणुकीविषयीचे सखोल मार्गदर्शन उपलब्ध होत आहे.

‘बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत व गजराज बिल्डर्स, वास्तू रविराज सहप्रायोजक असलेला हा उपक्रम येत्या शनिवारी, ११ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता कांती विसारिया सभागृह, महर्षी कर्वे मार्ग, गावदेवी मैदानाजवळ, नौपाडा, ठाणे (पश्चिम) येथे होणार आहे.

lok-chart

पॉवर्ड बाय पार्टनर एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, केसरी टुर्स, पुराणिक बिल्डर्स व जनकल्याण सहकारी बँक बँकिंग पार्टनर असलेल्या या कार्यक्रमात ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या २०१७-१८ साठीच्या अंकाचे प्रकाशन होईल. गुंतवणूकविषयक शंकांचे समाधान यावेळी उपस्थितांना तज्ज्ञ आर्थिक सल्लागारांकडून करून घेता येईल.

भांडवली बाजारातील गुंतवणुकीबाबत बाजार विश्लेषक व ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक अजय वाळिंबे यावेळी मार्गदर्शन करतील. तर उत्पन्न व कर यांचा संबंध जोडत योग्य कर नियोजन कसे करता येईल, हे कर सल्लागार प्रविण देशपांडे सांगतील. पद्धतशीरपणे केलेले आर्थिक नियोजन अधिक परतावा कसा देऊ शकेल, हे सनदी लेखाकार तृप्ती राणे या आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट करतील.