उमाकांत देशपांडे, मुंबई

उजनी धरणातील राज्यातील पहिलाच तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी देशविदेशातील कंपन्यांनी थंडा प्रतिसाद दिला आहे. परिणामी निविदा सादर करण्यासाठीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.

प्रकल्पातून निर्मित विजेसाठी प्रति युनिट चार ते साडेचार रुपयांहून अधिक दर मोजून ही महागडी वीज घ्यायची किंवा नाही, याचा विचार महावितरणलाही करावा लागणार असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाण्यावर राज्यातील पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन उर्जा व जलसंपदा विभागाने केले आहे. त्यासाठी निविदापूर्व देकार मागविण्यात आले होते. त्यावेळी प्रति युनिट साडेचार ते साडेपाच रुपये इतका दर काही कंपन्यांनी सुचविला होता. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांमध्ये निविदांची प्रक्रिया राबविली गेली. प्रति युनिट साडेतीन रुपयांपर्यंत दर मिळावा, असे ऊर्जा खात्याला अपेक्षित आहे.

उत्तरप्रदेशातील तरंगत्या सौर उर्जा प्रकल्पातून ३.२९ रुपये दराने वीज मिळणार असल्याने महाराष्ट्रातही स्वस्त दराने वीज उपलब्ध व्हावी, असे ऊर्जा खात्याचे प्रयत्न आहेत. युनिटला साडेतीन रुपये दरासाठी कंपन्यांची तयारी नाही. त्यामुळे निविदांना थंडा प्रतिसाद मिळाला.

परिणामी महावितरण कंपनीने निविदा शर्तीमध्ये सुधारणा करुन निविदा सादर करण्यासाठी मुदत १५ एप्रिलपर्यंत  वाढवली आहे, असे ऊर्जा खात्याच्या उच्चपदस्थांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

फीडरवरच्या सौर ऊर्जा प्रकल्पांमधून प्रति युनिट तीन रुपयांपर्यंत वीज उपलब्ध होणार आहे. त्या तुलनेत तरंगत्या सौर प्रकल्पातील वीज महाग असणार आहे. तरंगत्या ऊर्जा प्रकल्पात वीजनिर्मिती करणारी पॅनेल्स पाण्याबरोबर वाहून जाऊ नये, यासाठी ती मजबूत केबलने बांधून ठेवावी लागतात. पाण्यात चालू शकेल, अशा दर्जाचे साहित्य असावे लागते. त्यामुळे प्रकल्पातील वीज तुलनेने महाग असते, असे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.