पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘मेक इन इंडिया’ च्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील महोत्सवाच्या निमित्ताने देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई १३ ते १८ फेब्रुवारी या सप्ताहात दुमदुमणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते १३ फेब्रुवारीला या सप्ताहाचे उद्घाटन होणार असून काही देशांचे राष्ट्रप्रमुख व वरिष्ठ नेते, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमुख, उद्योगपती यांच्यासह सुमारे १० हजार प्रतिनिधी त्यास उपस्थित राहणार आहेत. देशात गुंतवणुकीचे सर्वोत्तम ठिकाण मुंबई आणि महाराष्ट्र आहे, हे गुंतवणूकदारांवर बिंबविण्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भर राहणार आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अशाप्रकारच्या सप्ताहाचे आयोजन मुंबईत प्रथमच होत असून राज्य सरकार, एमआयडीसी, सीआयआय आदींनी संयुक्तपणे केले आहे. या सप्ताहाच्या ‘लामणदिवा’ या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आले. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, उद्योग सचिव अपूर्व चंद्रा, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष डॉ. पवन गोएंका आदी उपस्थित होते. चीन, जपान यांच्या बाजारपेठेतील अनुभवानंतर आता भारत ही जागतिक गुंतवणूकदारांच्या दृष्टीने महत्वाची बाजारपेठ आहे. देशाकडे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा कल वाढत असताना अशाप्रकारचा सप्ताह आयोजित करण्याची संधी पहिल्यांदा महाराष्ट्राला मिळणे, हा गौरव आहे. मुंबईसह राज्यातील सर्व समाजघटकांनी एकत्रित येऊन राज्यात गुंतवणूक वाढेल, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईच्या प्रचाराचे ‘लक्ष्य’ साधणार
या सप्ताहात ‘मेक इन मुंबई’ वर स्वतंत्र चर्चासत्र १५ फेब्रुवारीला ठेवण्यात आले असून त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष लक्ष असणार आहे. मुंबईत रिअल इस्टेट, सेवा, पर्यटन, यासह अन्य गुंतवणुकीच्या संधी साधून गुंतवणूक मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मुंबई ही केवळ देशाचीच नाही, तर आंतरराष्ट्रीय वित्तीय घडामोडींचे महत्वाचे केंद्र होईल आणि येथे आंततराष्ट्रीय वित्तीय केंद्र (आयएफसी) होईल, असा विश्वास मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी व्यक्त केला.
