शेअर बाजारातील घसरण सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. बुधवारी सेन्सेक्स १९.१७ अंश घसरणीसह २७,२८७.६६ वर स्थिरावला. तर ९.९५ अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,२५१.७० पर्यंत खाली आला.
मुंबई निर्देशांकाने मंगळवारी जवळपास अर्धशतकी घसरण राखली होती. यामुळे सेन्सेक्स त्याच्या गेल्या दोन महिन्यांच्या वरच्या टप्प्यावरूनही खाली आला होता. बुधवारी व्यवहारातील सुरुवातीच्या तेजीनंतर बाजारात दिवसअखेर घसरण नोंदली गेली. सत्रात सेन्सेक्स २७,४४५.२४ पर्यंत झेपावला होता. तर व्यवहारातील तळ २७,१९०.५५ राहिला.
निफ्टीचा बुधवारचा प्रवास ८,२९४.४० ते ८,२१७.१५ दरम्यान राहिला. सेन्सेक्समधील ३० पैकी १३ समभागांचे मूल्य रोडावले. त्यात औषधनिर्माण क्षेत्रातील डॉ. रेड्डीजला ३.३० टक्के घसरणीचा फटका बसला.