देशाच्या वाहन उद्योगाला घरघर लागली असल्याचे वार्षिक विक्रीच्या ताज्या आकडय़ातून शुक्रवारी स्पष्ट झाले. प्रवासी वाहन क्षेत्रात मारुती सुझुकीची मक्तेदारी कायम आहे. देशातील पहिल्या क्रमांकाच्या या कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत किरकोळ वाढ राखूनही बाजारातील जवळपास निम्मा हिस्सा राखला आहे. तुलनेत महिंद्र अॅण्ड मिहद्रने हिस्सा विक्रीत यंदा घसरण नोंदवूनही क्रमांकाच्या यादीत स्पर्धक टाटा मोटर्सला मागे टाकले आहे.
वाहन उत्पादकांच्या ‘सियाम’ संघटनेने गेल्या आर्थिक वर्षांतील प्रवासी वाहन विक्रीच्या आकडय़ांबरोबरच देशातील कंपन्यांचा क्रम जाहीर केला आहे. या यादीत ४२ टक्क्यांसह मारुती सुझुकी पहिल्या स्थानावर आहे. वर्षभरात कंपनीचा बाजार हिस्सा ३९.४३ टक्क्यांवरून वाढत गेला आहे. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या मूळच्या कोरियन ह्युंदाई मोटर्स इंडियाचा बाजार हिस्सा १५.१८ टक्के राहिला आहे. गेल्या आर्थिक वर्षांतील १४.३८ टक्क्यांच्या तुलनेत यंदा त्यात काहीशी घसरण झाली आहे.
बाजार हिश्शाबाबत १०.१५ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर मिहद्र अॅण्ड महिंद्र आहे. प्रवासी वाहन क्षेत्रात मात्र कंपनीचा हिस्सा गेल्या वेळच्या ११.६५ टक्क्यांवरून यंदा घसरला आहे. असे असले तरी एसयूव्ही श्रेणीत अग्रेसर असणाऱ्या या कंपनीने कट्टर स्पर्धक टाटा मोटर्सला तिसऱ्या स्थानावरून दूर सारले आहे. अवघ्या ७.९४%बाजार हिश्श्यासह टाटा मोटर्स यंदा चौथ्या स्थानावर राहिली आहे. कंपनीचा गेल्या आर्थिक वर्षांतील बाजार हिस्सा ११.६५ टक्के होता. यंदा तो एकेरी आकडय़ावर आला आहे. पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या होन्डा आणि टोयोटाचा बाजार हिस्सा अनुक्रमे ५.३६ व ५.१४ टक्के राहिला आहे.
२०१३-१४ मध्ये महिंद्रची वाहन विक्री १८.१४ टक्क्यांनी घसरली होती; तर टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीतही यादरम्यान ३६.७७ टक्के घट नोंदविली गेली. उलट डिझेल अमेझ तसेच नव्या होन्डा सिटीच्या जोरावर होन्डा कंपनीने तब्बल ८२.८१ टक्क्यांची वाहन विक्री राखली. बंगळुरूतील आपल्या प्रकल्पात कामगार संपाचा फटका बसलेल्या टोयोटाच्या वाहन विक्रीतही २२.१७ टक्के घट होऊनही कंपनीने बाजार हिस्सा मात्र उंचावता ठेवला आहे.
देशांतर्गत एकूण विक्री
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2014 रोजी प्रकाशित
बाजार हिश्शात मारुती अव्वलच
देशाच्या वाहन उद्योगाला घरघर लागली असल्याचे वार्षिक विक्रीच्या ताज्या आकडय़ातून शुक्रवारी स्पष्ट झाले.
First published on: 12-04-2014 at 12:31 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki boosts passenger vehicle market