नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित ५ जी ध्वनिलहरींच्या लिलावाला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवेगवान, नवयुगातील नवीन प्रकारच्या सेवा आणि व्यवसाय प्रारूपांची पायाभरणी करणाऱ्या ५ जी सेवा चालू वर्षांत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.
मंगळवारपासून सुरू होणाऱ्या ५ जी ध्वनिलहरींच्या लिलावात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी डेटा नेटवर्क्स सहभागी होणार आहेत. विश्लेषकांच्या मते, ध्वनिलहरींची पुरेशी उपलब्धता आणि मर्यादित सहभागीदारांमुळे आक्रमक बोली लागण्याची शक्यता कमी झाली आहे. लिलावात वीस वर्षांच्या कालावधीसाठी एकूण ७२,०९७.८५ मेगाहर्टझ ध्वनिलहरी उपलब्ध करण्यात येणार आहेत. दूरसंचार कंपन्यांनी लिलावात सहभागी होण्यासाठी गेल्या आठवडय़ात सरकार पदरी अग्रिम ठेव रक्कम जमा केली.
दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील आघाडीच्या जिओ इन्फोकॉमने ५जी लिलावात सहभागी होण्यापूर्वी १४,००० कोटी रुपयांची अग्रिम ठेव (ईएमडी) सादर केली आहे. त्यापाठोपाठ एअरटेलने ५,५०० कोटी रुपये, तर कर्जजर्जर व्होडा-आयडियाने २,२०० कोटी रुपये जमा केले आहेत. तर यंदा लिलावामध्ये पहिल्यांदा सहभागी होणाऱ्या अदानी समूहाने १०० कोटी रुपये रक्कम जमा केली आहे. कंपन्यांकडून लिलावाआधी जमा करण्यात येणाऱ्या ठेवीच्या रकमेवरून त्यांची रणनीती आणि ध्वनिलहरी खरेदी योजना याबाबत संकेत मिळतात. सामान्यत: दूरसंचार कंपन्यांकडून अग्रिम ठेव रकमेच्या जास्तीत जास्त ८ ते १० पट बोली लावली जाते.