चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत, म्हणजे सप्टेंबर २०१४ अखेर म्युच्युअल फंडांनी लोकांकडून गोळा केलेली गुंतवणुकीने म्हणजे त्यांच्या गुंतवणूकयोग्य गंगाजळीने विक्रमी १०.५८ लाख कोटी रुपयांपल्याड मजल मारली आहे. पहिल्या तिमाहीतील ९.८७ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत फंडांची गंगाजळी ७.२ टक्क्यांनी उंचावली आहे.
भांडवली बाजारातील उत्साहवर्धक वातावरणामुळे जून ते सप्टेंबर तिमाहीत फंडांची मालमत्ता ७१ हजार कोटी रुपयांनी वधारल्याचे ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अ‍ॅम्फी)’ने म्हटले आहे. सरलेल्या सप्टेंबरमध्येच सेन्सेक्सने २७,३१९.८५ या सार्वकालिक उच्चांकी टप्प्याला गवसणी घातली आहे.
या गुंतवणूकयोग्य गंगाजळीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या देशभरात ४५ म्युच्युअल कंपन्या आहेत. तर त्यांच्या विविध योजना या २,५०० हून अधिक आहेत. यामध्ये एचडीएफसी म्युच्युअल फंड १.४१ लाख कोटी रुपयांच्या गंगाजळीसह अव्वल स्थानावर आहे. एक लाख कोटी रुपयांहून अधिक गंगाजळी असलेल्या चार कंपन्या आहेत.
यापूर्वी सर्वप्रथम मेमध्ये फंड गंगाजळीने १० लाख कोटी रुपयांपल्याड पोहोचली होती. लोकसभा निवडणुकीच्या अनुकूल निकालांमुळे भांडवली बाजारात परतलेल्या सकारात्मक वातावरणाने घडविलेला हा परिणाम होता.