अस्वस्थ शेअर बाजारातील हालचालीनंतरही गुंतवणूकदारांचा ओढा म्युच्युअल फंडांकडे कायम राहिला आहे. एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक यादीत यंदा यूटीआयलाही स्थान मिळाले आहे.
जुलै ते सप्टेंबर २०१५ या चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीत विविध म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक १३ लाख कोटी रुपयांपल्ल्याड गेली आहे. फंड क्षेत्रातील आघाडीच्या पहिल्या १० कंपन्यांची मत्ता वाढली आहे.
‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ या फंड कंपन्यांचे व्यवस्थापन हाताळणाऱ्या कंपन्यांच्या संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार, जुलै ते सप्टेंबर २०१५ दरम्यान एकूण ४३ फंड घराण्यांची मालमत्ता १३.१५ लाख कोटी रुपये झाली आहे. आधीच्या, पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ती यंदा ७.१ टक्क्यांनी (८७,२३८.९० कोटी रुपयांनी) वाढली आहे.
‘यूटीआय’ची सरस धावगती
आघाडीच्या फंड कंपन्यांमध्ये पाचवे स्थान राखणाऱ्या यूटीआयने एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा अनोखा टप्पा पार केला आहे. कंपनीने दुहेरी आकडय़ातील वाढ नोंदविली आहे. तर १.७० लाख कोटी रुपयांसह एचडीएफसीची आघाडी कायम आहे.
वाढत्या कर्जाचा भार असलेल्या वाहनांच्या सुटे भाग उत्पादक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या जेपी मॉर्गन म्युच्युअल फंड कंपनीला या तिमाहीत चांगलाच फटका बसला आहे. कंपनीची मालमत्ता दुसऱ्या तिमाहीत तब्बल १५ टक्क्यांनी घसरून १२,४५५.१७ कोटी रुपयांवर आली आहे.
मोदी पर्वात ३३ टक्के वाढ
मे २०१४ देशात सत्तापालट झाला आणि मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून फंड गंगाजळीत तब्बल एक-तृतीयांशाने फुगली आहे. जून २०१४ अखेर ९.९ लाख कोटी रु. असलेली गंगाजळी सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या १५ महिन्यांत १३.२ लाख कोटींवर गेली आहे. या काळात केवळ समभागसंलग्न (इक्विटी) योजनांतील निव्वळ वाढ १.१२ लाख कोटी रुपयांची आहे.