नवी दिल्ली : जागतिक स्तरावरील विद्युत वाहनांच्या निर्मितीतील आघाडीच्या टेस्ला मोटर्सने भारतातच वाहनांची निर्मिती करावी. मात्र चीनमधून वाहनांची आयात करून ती भारतात आणू  नये, असे केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी भूमिका स्पष्ट केली. 

टेस्लाने गेल्या वर्षी भारतात वाहनांच्या आयातीवर करसवलत देण्यात सरकारकडे विचारणा केली होती. मात्र टेस्लाने सर्वप्रथम भारतात गुंतवणूक करून वाहन निर्मिती सुरू करावी, त्यांनतर करसवलतीबाबत विचार केला जाईल, असे केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने स्पष्ट केले होते. त्याच भूमिकेचा पुनरुच्चार गडकरी यांनी मंगळवारी केला. 

भारत सरकारचा इलॉन मस्क यांच्या ‘टेस्ला’ कंपनीला स्थानिक पातळीवर विद्युत वाहन निर्मितीस प्रोत्साहन देण्याचा विचार आहे. भारतीय बाजारपेठेची प्रचंड मोठी क्षमता असून विद्युत वाहनांच्या विक्रीला मोठा वाव आहे. ‘टेस्ला’ने अंशत: बांधलेली वाहने आयात करण्यापेक्षा देशातच विद्युत वाहनांची निर्मिती करावी आणि अशा तऱ्हेने तयार होणाऱ्या वाहनांची निर्यात केल्यास कंपनीसाठी कोणतीही समस्या येणार नाही आणि केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत मिळेल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.

भारतात मोठय़ा प्रमाणावर विद्युत वाहनांसाठी खरेदीदार वर्ग आहे. त्याचप्रमाणे पुरेशा प्रमाणात तंत्रज्ञान उपलब्ध असून वाहन निर्मितीसाठी आवश्यक सुटे भाग निर्मितीची क्षमता आहे. यामुळे भारत आणि टेस्ला या दोघांसाठीही फायद्याची स्थिती आहे.

सध्या देशात ४०,००० डॉलरहून अधिक किमतीच्या वाहनांच्या आयातीवर ६० ते १०० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क आकारले जाते. तसेच वाहनाचा प्रकार, इंजिन आणि मालवाहतूक खर्चानुसार वाहनाच्या किमतीत बदल होत असतो.

गेल्या वर्षी टेस्लाचे भारत सरकारकडे विद्युत वाहनांनावरील करभार ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा १० टक्के सामाजिक कल्याण अधिभार मागे घेण्याची विनंती केली होती.

ग्राहकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता

ग्राहकांच्या सुरक्षेला सरकारची सर्वोच्च प्राथमिकतादेशात सध्या विद्युत शक्तीवर चालित दुचाकींना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे सांगत, नितीन गडकरी यांनी दुचाकी निर्मात्या कंपन्यांना सर्व सदोष वाहने परत बोलावण्याचे आवाहन केले आहे.  मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील उच्च तापमानाच्य वातावरणामुळे विद्युत वाहनांच्या बॅटरीमध्ये काही समस्या आहे निर्माण होत असल्याचे गडकरी यांनी मान्य केले आहे. देशात विद्युत वाहन उद्योगाने नुकतीच सुरुवात केली असून सरकार त्यात अडथळा आणू इच्छित नाही. मात्र ग्राहकांच्या सुरक्षेला सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि मानवी जीवनाशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.