यंदाच्या तिमाहीत कंपन्यांची महसुली वाढ दोन वर्षांत उच्चांक नोंदवेल; ‘क्रिसिल’चा आशावाद
भारतीय उद्योगक्षेत्राच्या आर्थिक कामगिरीत सुधारणेचे संकेत असून, दोन वर्षांनंतर प्रथमच एप्रिल-जून २०१६ या तिमाहीत कंपन्यांची महसुलातील सरासरी वाढ ही आठ टक्क्य़ांपेक्षा अधिक राहील, असे आशादायी कयास प्रतिष्ठेची मानांकन संस्था ‘क्रिसिल’ने व्यक्त केले आहेत. मुख्यत: निर्यातप्रधान माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची कामगिरी सरस राहण्याचे अंदाज आहेत. कंपन्यांच्या जून तिमाहीतील वित्तीय कामगिरीचे निकाल पुढील आठवडय़ापासून सुरू होतील.
या आधीच्या जानेवारी-मार्च २०१६ या तिमाहीत कंपन्यांची सरासरी महसुली वाढीचा दर हा ६.५ टक्के होता. कंपन्यांच्या वित्तीय कामगिरीत सुधाराचा हा एक दृढ संकेत होता आणि तो पुढेही सुरू राहील, असे क्रिसिलने आपल्या अहवालात मत नोंदविले आहे. मार्चपूर्वीच्या सलग पाच तिमाहींमध्ये कंपन्यांची महसुली वाढीचा सरासरी दर नकारात्मक राहिला असून, त्यात प्रत्येक तिमाहीत १ ते ३ टक्के घसरण आढळून आली आहे.
दीर्घ मुदतीचा महसुली वाढीचा सरासरी १२ ते १५ टक्के दराच्या तुलनेत जून तिमाहीअखेर अपेक्षित दर लक्षणीय खाली राहणार असला तरी चलनवाढीच्या दराशी जुळवून पाहिल्यास अत्यंत उज्ज्वल असे चित्र पुढे येईल. वस्तुत: कंपन्यांच्या महसुली वाढीच्या गत चार वर्षांच्या सरासरीपेक्षा तो दर निश्चितच सरस असेल, असे क्रिसिलचा अहवाल स्पष्ट करतो.
वार्षिक ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या कंपन्यांकडून जून २०१६ तिमाहीपासून पहिल्यांदाच ‘भारतीय लेखा मानदंडा’चा वापर सुरू होणार असून, आगामी आठवडय़ापासून सुरू होणाऱ्या निकाल हंगामात त्या परिणामी काही आश्चर्यकारक निष्कर्ष पुढे येणेही अपेक्षित असल्याचे क्रिसिलला वाटते.
क्रिसिलने आर्थिक उभारीचा हा निष्कर्ष वित्तीय सेवा तसेच तेल व वायू क्षेत्रातील कंपन्या वगळता अन्य ६०० कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीच्या विश्लेषणाअंती मांडला आहे. राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) वरील ७० टक्के बाजार भांडवलाचे या कंपन्या प्रतिनिधित्व करतात.
उभरत्या अर्थव्यवस्थांच्या दृष्टीने भारतातील कंपन्यांची जून तिमाहीतील अपेक्षित कामगिरी ही चीन, दक्षिण कोरिया, तैवान आणि दक्षिण आफ्रिका या देशांतील कंपन्यांच्या तुलनेत वरचढ ठरणारी असेल.
देशांतर्गत बाजारपेठेत दमदार ठरलेल्या त्याचप्रमाणे जागतिक मलूलता असतानाही चांगली निर्यात कामगिरी करणाऱ्या आयटी सेवा क्षेत्रातून उत्तम महसुली वाढीची अपेक्षा आहे.
तथापि निम्मा महसूल जेथून येतो त्यात ग्रामीण भागातून मागणी अद्याप थंडावलेली असल्याने, ग्राहकोपयोगी उत्पादनांतील (एफएमसीजी) कंपन्यांची महसुली कामगिरी यथातथाच राहील, असा क्रिसिलचा अंदाज आहे. तसेच भांडवली वस्तू निर्मिती क्षेत्र हे उद्योगक्षेत्रातून विस्तार कार्यक्रम थंडावलेलाच असल्याने त्यांची महसुली वाढीचा दर उणे पाच टक्क्य़ांच्या घरात राहण्याचे कयास आहेत.
* अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय मूल्यात ५ टक्क्य़ांची घसरण पाहता, आयटी सेवा क्षेत्रातून सरासरी १५ टक्के महसुली उत्पन्न वाढणे या तिमाहीत अपेक्षित
* औषधी क्षेत्रातून नवीन उत्पादनांची प्रस्तुती पाहता तिमाहीत १५ टक्क्य़ांची महसुली वाढ अपेक्षिता येईल.
* देशांतर्गत उपभोगाचे लाभार्थी क्षेत्र संघटित किरकोळ विक्रेता क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि शहरी मागणीतील वाढ लक्षात घेता दुचाकी निर्मात्या कंपन्यांकडून भरीव कामगिरी अपेक्षित आहे.
* सीमेंट निर्मात्या कंपन्या, बांधकाम कंपन्यांकडून मुख्यत: सरकारकडून अनेक बांधकाम प्रकल्पांवर गुंतवणूक व चालना मिळाल्याने सरासरी ७ ते ८ टक्के महसुली वाढ तिमाहीत दिसून येईल. आधीच्या सरासरी ५ टक्के वृद्धीदरापेक्षा यंदाच्या तिमाहीतील हा दर सरसच असेल.