मुंबई : देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सरलेल्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ७.२८ लाख कोटी रुपयांचा महसूल कमावणारी कामगिरी केली आहे. कोणत्याही भारतीय कंपनीने वर्षांत कमावलेला हा आजवरचा सर्वोच्च महसूल आहे. सीपीसीएल या उपकंपनीची कामगिरी जमेस धरल्यास तिचा एकत्रित महसूल ७.३६ लाख कोटींवर गेला आहे.

कंपनीने मंगळवारी जाहीर केलेल्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीनुसार, जानेवारी-मार्च तिमाहीत तिच्या निव्वळ नफ्यात ३१.४ टक्क्यांची घसरण होत तो ६,०२१.८८ कोटी रुपये नोंदविला गेला. तेल शुद्धीकरण नफ्याच्या (जीआरएम) प्रमाणात दमदार वाढ होऊनही, पेट्रो-रसायनांतील घसरता नफा आणि आणि इंधन विक्रीतील तोटा यामुळे नफ्याला कात्री लागली आहे. मागील वर्षी जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये कंपनीने ८,७८१.३० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. कंपनीने भांडवली बाजाराला सूचित केल्याप्रमाणे, भागधारकांना दोनास एक बक्षीस समभाग (बोनस) आणि प्रति समभाग ३.६० रुपये (बोनस-पूर्व) अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. अंतरिम लाभांश जमेस कंपनीने दिलेला एकूण लाभांश प्रति समभाग ९ रुपये होतो.