स्मार्टफोनच्या प्रांगणातील वाढत्या किंमतयुद्धाने रिलायन्स रिटेलने आपला ‘४ जी’ समर्थ फ्लेम प्रकारातील स्मार्टफोनच्या किमती घसघशीत खाली आणल्या आहेत. फ्लेम-३, फ्लेम-४, फ्लेम-५ आणि फ्लेम-६ या चार मॉडेल्सची किंमत प्रत्येकी २,९९९ रुपये अशी गुरुवारी जाहीर करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे इतर लाइफ उपकरणाप्रमाणेच, या फ्लेम प्रकारात उपलब्ध असलेला फोन हे व्होल्टे अर्थात व्हॉइस ओव्हर एलटीई प्रणालीने समर्थ असून, वेगवान संदेशवहन, उच्च दर्जाची आवाजी आणि व्हिडीओ कॉलिंग सुविधा अशा स्मार्ट वैशिष्टय़ासह अत्युत्तम हार्डवेअर तंत्रज्ञान त्यात सामावले आहे. शिवाय प्रत्येक फोनसोबत मोफत जिओ प्रीव्ह्य़ू दिला गेला असल्याने लाइफ फोन विकत घेणाऱ्या प्रत्येकाला सगळ्या जिओ सेवांचा लाभ आणि तीन महिन्यांसाठी मोफत ४जी डेटा सेवाही मिळेल. यामुळे लाइफ हा भारतातला सर्वात परवडण्याजोगा स्मार्टफोन बनला असून, लाखो ग्राहकांसाठी डिजिटल जीवनाची दारे त्यातून खुली होतील, असा कंपनीने दावा केला. पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया उपक्रमाला चालना मिळेल, असा रिलायन्स रिटेलचा विश्वास आहे.