वृत्तसंस्था, नवी दिल्ली : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सरलेल्या ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत भांडवली बाजारातील समभाग खरेदीने डॉलरच्या तुलनेत रुपयाने ३० ऑगस्टच्या सत्रात ४७ पैशांची वाढ नोंदवत वर्षांभरातील सर्वोत्तम कामगिरी केली. सोमवारच्या सत्रात भांडवली बाजारातील घसरणीबरोबरच रुपया डॉलरच्या तुलनेत ८०.१५ या नवीन नीचांकी पातळीला पोहोचला. मात्र, मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्सच्या १,५६४ अंशांच्या उसळीने रुपयानेही २७ ऑगस्ट, २०२१ नंतरची सर्वोत्तम कामगिरी बजावली. निफ्टीदेखील ३० ऑगस्टच्या सत्रात २.७ टक्क्यांनी वधारला. परदेशी गुंतवणूकदारांनी एकटय़ा ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत भांडवली बाजारात ६ अब्ज डॉलरची म्हणजेच ४८,००० कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक केली. ती डिसेंबर २०२० नंतरची सर्वाधिक आहे.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाला सावरण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्नधान्याच्या किमतीतील घसरण आणि खनिज तेलाच्या किमतीतील नरमाईमुळे रुपयाला बळ मिळाले, असे मत एचएसबीसीच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले.

अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदर वाढीबाबत आक्रमक पवित्रा कायम राखला जाणार असल्याचे संकेत दिले. शिवाय जगातील सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थेत मंदीचे सावट असल्याने नजीकच्या काळात अस्थिरता वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जपानी येन आणि चिनी युआनसारख्या प्रमुख आशियाई चलनांची डॉलरच्या तुलनेत आगामी वाटचाल आणि रिझव्‍‌र्ह बँक डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण रोखण्यासाठी कितपत यशस्वी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल,ह्णह्ण असे सल्लागार सेवा कंपनी सीआर फॉरेक्सचे व्यवस्थापकीय संचालक अमित पाबारी म्हणाले.