वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारताने रशियाकडून खनिज तेलाची आयात लक्षणीय प्रमाणात वाढवली आहे, तर दुसरीकडे आखातातून होणारी तेलाची आयात सरलेल्या सप्टेंबरमध्ये १९ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर रोडावली आहे. भारताकडून होणाऱ्या तेल आयातीमध्ये इराकने अव्व्ल स्थान कायम राखले आहे तर रशिया सौदी अरेबियाला मागे टाकून दुसरा सर्वात मोठा खनिज तेल पुरवठादार ठरला आहे. चीननंतर भारत रशियाचा सर्वात मोठा तेल आयातदार बनला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनसारख्या बडय़ा तेल कंपन्यांचे प्रकल्प देखभालीमुळे काही काळ बंद असल्याने सप्टेंबरमध्ये भारताची एकूण तेल आयात प्रतिदिन ३९.१ लाख पिंपांवरून कमी होत १४ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली, जी मागील वर्षांतील सप्टेंबरच्या तुलनेत ५.६ टक्क्यांनी कमी आहे. भारताच्या तेल आयातीतील रशियाचा वाटा मागील महिन्याच्या १९ टक्क्यांच्या पातळीवरून वाढून २३ टक्क्यांच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. तर आखाती देशांचा वाटा ५९ टक्क्यांवरून, ५६.४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. आखातातून भारताची आयात प्रतिदिन २२ लाख पिंपांपर्यंत घसरली आहे, जी ऑगस्टच्या तुलनेत १६.२ टक्क्यांनी कमी आहे, तर रशियामधून आयात ४.६ टक्क्यांनी वाढून प्रतिदिन ८.९६ लाख पिंप झाली आहे.
चालू वर्षांत फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवरील केलेल्या आक्रमणामुळे काही पाश्चात्त्य देशांनी रशियातून तेल खरेदी टाळल्याने सवलतीच्या किमतींचा फायदा घेत भारत हा चीननंतर रशियाचा दुसरा सर्वात मोठा तेल खरेदीदार बनून पुढे आला आहे. सध्या रशियाकडून खनिज तेलावरील सवलत आता कमी झाली आहे. मात्र अजूनही मध्यपूर्वेतील देशांकडून आयात केल्या जाणाऱ्या किमतीची तुलना करता, रशियन तेल अजूनही स्वस्त आहे. सौदी अरेबियाकडून आयात सुमारे प्रतिदिन ७.५८ लाख पिंप या तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. ऑगस्टपासून त्यात १२.३ टक्क्यांची घसरण झाली आहे.
