असंख्य गुंतवणूकदारांचे तब्बल २० हजार कोटी रुपये परत करण्याच्या आदेशाचे पालन होत नसल्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने घेतली सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि कंपनीच्या अन्य तीन संचालकांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस गुरुवारी बजावली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सेबीने कंपनीची मालमत्ता ताब्यात घेऊन त्याची विक्री करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
सुब्रतो राय यांच्यासह सहारा इंडिया रियल इस्टेट कॉपरेरेशन लि. आणि सहारा इंडिया हौसिंग इन्व्हेस्टमेंट कापरेरेशन लि. या कंपन्यांचे संचालक रवि शंकर दुबे, अशोक रॉय चौधरी आणि वंदना भार्गव यांनाही न्यायालयाने २६ फेब्रुवारी रोजी स्वत हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. न्या. के. एस राधाकृष्णन आणि जे एस खेहर यांच्या खंडपीठाने सेबीने सहारा समूहाची मालमत्ता विकण्याची कार्यवाही सुरू करावी, असेही नमूद केले. कंपनीच्या शक्य असलेल्या मालमत्तेचा लिलाव आयोजित करून पैशांची वसुली करावी. यात अडथळा निर्माण झाल्यास कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.