वधारलेले खनिज तेल, वायदापूर्तीपूर्वी भांडवली बाजारात तेजी
तेजीच्या लाटेवर स्वार असलेल्या भांडवली बाजाराने बुधवारी त्यात आणखी भर घातली. ५६.८२ अंश वाढीने सेन्सेक्स २६,०६४.१२ वर तर १७.२५ अंश वाढीने निफ्टी ७,९७९.९० पर्यंत पोहोचला. मुंबई निर्देशांकाचा २०१६ मधील हा आतापर्यंतचा तर निफ्टीचा नोव्हेंबर २०१५ नंतरचा बुधवारचा वरचा स्तर होता.
बाजारातील महिन्यातील वायदापूर्ती व्यवहार गुरुवार, २८ एप्रिल रोजी होत आहे. तत्पूर्वी वरच्या टप्प्यावरील समभागमूल्यांद्वारे गुंतवणूकदारांनी बुधवारीही नफेखोरी साधली. गेल्या सलग तीन व्यवहारातील मुंबई निर्देशांकातील झेप ही ३२८ अंशांची राहिली आहे.
मंगळवारी सेन्सेक्समध्ये एकाच सत्रात ३०० हून अधिक अंशांची झेप नोंदली गेली होती. तर निफ्टीनेही ७,९५० पुढील टप्पा गाठला होता. बुधवारच्या सत्राची सुरुवात काहीशी घसरणीने झाली. मंगळवारच्या तुलनेत १२० हून अधिक अंशांनी सेन्सेक्स घसरत २६ हजाराच्याही खाली उतरला. निफ्टीने ७,९४० पर्यंत घसरण राखली.
दिवसभर बाजार तेजी-वाढीच्या लाटेवर हिंदोळे घेत होता. सेन्सेक्स सत्रात २५,९६४ पर्यंत घसरला. तर २६,०९२ पर्यंत तो उंचावलाही. दिवसअखेर मात्र तो मंगळवारच्या तुलनेत फार मोठी झेप घेऊ शकला नाही.
सेन्सेक्समध्ये बुधवारी अदानी पोर्ट्सची कामगिरी लक्षणीय राहिली. कंपनीच्या समभागाचे मूल्य तब्बल ५ टक्क्यांनी वाढले. सोबतच भारती एअरटेल, ओएनजीसी, गेल, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, आयटीसी, एशियन पेंट्स, विप्रो या समभागांनाही मागणी राहिली.
मुंबई निर्देशांक ‘सेन्सेक्स’ मधील १७ समभाग तेजीत राहिले. मुख्य निर्देशांकाच्या तुलनेत स्मॉल आणि मिड कॅप निर्देशांक सकारात्मक असले तरी ते किरकोळ प्रमाणात वाढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* बाजारात बुधवारी माहिती तंत्रज्ञान तसेच तेल व वायू क्षेत्रातील समभागांची अधिक खरेदी झाली.
* आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरांनी पुन्हा एकदा तेजीचा प्रवास सुरू केल्याने तेल व वायू क्षेत्रातील समभागांचे मूल्य सव्वा टक्क्यापर्यंत उंचावले.
* डॉलरच्या तुलनेत अधिक भक्कम होत असलेल्या रुपयाचेही बाजारातील स्वागत बुधवारी कायम राहिले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex crosses 26000 mark
First published on: 28-04-2016 at 02:20 IST