भांडवली बाजाराची सप्ताहारंभ घसरण; सेन्सेक्समध्ये शतकी आपटी

नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना भांडवली बाजारांनी सोमवारी नकारात्मक प्रवास नोंदविला.

नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना भांडवली बाजारांनी सोमवारी नकारात्मक प्रवास नोंदविला. समस्त व्यवहारात तेजीत असलेला मुंबई शेअर बाजार अखेरच्या अध्र्या तासात विक्रीच्या बाजुने झुकल्यानंतर दिवसअखेर घसरणीसह बंद झाला. गेल्या पंधरवडय़ातील सर्वात मोठी आपटी एकाच व्यवहारात नोंदवित सेन्सेक्सने त्याच्या सत्रातील उच्चांकापासून तब्बल ४०० अंश अंतर राखले.
संसदेच्या मान्सून अधिवेशनात वस्तू व सेवा कर, जमीन हस्तांतरण आदी विधेयके पूर्णत्वास जात नसल्याचे मानून गुंतवणूकदारांनी सोमवारच्या व्यवहारात सत्रअखेरिस समभाग विक्रीचा सपाटा लावला. विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्री धोरणामागे रुपयातील कमकुवतपणा कारणीभूत ठरला.
तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कमी होत असलेल्या कच्च्या तेलाचे दर भारताच्या आयात खर्चात कपात करण्याचा आशावादही बाजारात उमटला.
नव्या सप्ताहाची सुरुवात २८,२५०.७८ या वरच्या टप्प्यावर सुरुवात करणारा सेन्सेक्स सत्रात थेट २८,४१७.५९ पर्यंत झेपावला. हा क्रम व्यवहाराची अखेर होण्यापूर्वीच्या अर्धा तास कायम होता. यानंतर मात्र बाजारात नफेखोरी होऊ लागली.
परिणामी, याचवेळी सेन्सेक्सने २८,०१७.८५ हा सत्राचा तळ गाठला. दिवसअखेर तो शुक्रवारच्या तुलनेत १०० हून अधिक अंशांनी रोडावला. त्याचबरोबर तो सत्रातील उच्चांकापासून ४०० अंशांनीही ढळला. दिवसअखेर १३४.६७ अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,१०१.७२ वर स्थिरावला. त्याची ही २७ जुलैनंतरची सत्रातील सर्वात मोठी आपटी ठरली.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सोमवारी ८,६०० हा अनोखा टप्पा पादाक्रांत केला. सत्रात निफ्टी ८,६२१.५५ पर्यंत उंचावला. दिवसअखेर त्यात गेल्या सप्ताहअखेरच्या तुलनेत ३९ अंश घसरण नोंदली जाऊन निर्देशांक ८,५२५ वर थांबला.
निफ्टीने ८,४९७.८० हा ८,५०० च्या खालचा तळ व्यवहारात नोंदविला. देशातील सर्वात मोठय़ा भांडवली बाजाराची उलाढालही रोडावत १६,३७८.८४ कोटी रुपयांवर येऊन ठेपली.
सेन्सेक्समधील ३० पैकी २० समभागांचे मूल्य घसरले. ओएनजीसीच्या आघाडीसह, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्रू, टाटा मोटर्स, एनटीपीसी, कोल इंडिया, हिंदाल्को, रिलायन्स इंडस्ट्रिज, वेदांता, इन्फोसिस, आयटीसी आदींचे मूल्य कमी झाले. तर भेल, हीरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी, गेल इंडिया यांनी व्यवहारअखेरही तेजी कायम राखली.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद निर्देशांक सर्वाधिक एक टक्क्य़ाहून अधिक प्रमाणात घसरला. मुंबई शेअर बाजाराची उलाढाल कमी होत ती सोमवारी ३,१०४.६९ कोटींवर आली.
आंतरराष्ट्रीय, विशेषत: आशियाई बाजारात तेजीचे वातावरण होते. तेथील शांघाय, तैवान, जपानचे प्रमुख निर्देशांक अध्र्या टक्क्य़ांपर्यंत वाढले होते.
तर युरोपीय बाजारात घसरणीचे चित्र राहिले. फ्रान्स, ब्रिटन, जर्मनीतील प्रमुख निर्देशांक त्यात होते.

सोने, चांदी चकाकली; रुपया नरमला
भांडवली बाजार, परकी चलन व्यवहारात सोमवारी नरमाई नोंदली जात असताना सराफा बाजार अचानक झळाळून उठला.
सोन्याचा प्रवास पुन्हा एकदा तोळ्यासाठी २५ हजाराकडे जाताना दिसला. स्टॅण्डर्ड सोने १० ग्रॅमसाठी सोमवारी ५५ रुपयांनी वाढून २४,८२५ रुपयांवर गेले. तर याच प्रमाणात शुद्ध सोने वाढत २५ हजार रुपयांनजीक पोहोचले. प्रति किलो १६०  रुपयांनी चांदी महाग होत ३५ हजारानजीक, ३४,८४० रुपयांवर गेली. तर डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी ६ पैशांनी रोडावत ६३.८७ पर्यंत घसरला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensex drop 400 points

ताज्या बातम्या