सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारच्या सत्रात नव्या उच्चांकाला पोहोचलेला शेअर बाजार दिवसअखेर मात्र या टप्प्यापासून दुरावला. व्यवहारात सर्वोच्च अशा २२,०७९.९६ अंशांपर्यंत पोहोचलेला सेन्सेक्सने कालच्या तुलनेत मामुली ०.२७ अंशाने घसरत २२,०५५.२१ वर विश्रांती घेतली. तरी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने मात्र विक्रमी आगेकूच सलग दुसऱ्या व्यवहारात कायम राखली. सोमवारच्या तुलनेत ६.२५ अंश वाढीसह तो ६,५८९.७५ या नव्या टप्प्यावर पोहोचला. सोमवारी दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी विक्रमी उसळी घेत नव्या सप्ताहास प्रारंभ केला होता. या दिवशी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १,४६५.६२ कोटी रुपयांची खरेदी केली. मंगळवारच्या व्यवहारात मात्र एकंदर उलाढाल ओसरलेली व बाजारात सुस्ती दिसून आली. तेल व वायू वगळता इतर जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये किरकोळ वाढ नोंदली गेली. सेन्सेक्समधील निम्मे समभाग घसरले.

रुपयाही सात महिन्यांच्या उच्चांकावर
मुंबई: चालू आठवडय़ात सलग दुसऱ्या दिवशी झेप घेताना रुपयाने मंगळवारी २९ पैशांची भर घातली. यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन ६०.४८ वर पोहोचले. स्थानिक चलनाचा हा गेल्या सात महिन्याचा उच्चांक राहिला आहे. रुपयाने सोमवारीदेखील २८ सप्ताहाच्या वरचा स्तर नोंदविला होता. सोमवारच्या ६०.७७ बंदनंतर ६०.६० अशी सकारात्मक सुरुवात करणारा रुपया मंगळवारच्या व्यवहारात ६०.४४ पर्यंत झेपावला. दिवसअखेर विसावलेला रुपयाने १ ऑगस्ट २०१३ च्या ६०.४३ या स्तरानजीक राहणे पसंत केले. रुपया सलग तीन व्यवहारात मिळून ८६ पैशांनी उंचावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.