भांडवली बाजाराचा प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने बुधवारी वर्षांतून दुसऱ्यांदा २१ हजाराच्या पातळीला स्पर्श केला. पण दिवसअखेर ही पातळी निर्देशांकाला सांभाळता आली नाही आणि तो किंचित खाली २०,९८७ अंशांवर स्थिरावला. तरी कालच्या तुलनेत त्याने १३५ अंशांची कमाई केली.
जागतिक बाजारांचा कल संमिश्र स्वरूपाचा असतानाही ‘सेन्सेक्स’ची गेल्या सप्ताहापासून घोडदौड सुरूच असताना, आज त्याने २१ हजाराचे टोक गाठलेच. सेन्सेक्सच्या आजच्या तेजीत देशातील सर्वात मोठी वायू वितरक सरकारी कंपनी गेल २.९७ अंशासह आघाडीवर होती. सिगारेट उत्पादक आयटीसीने त्या खालोखाल २.०७ अंशांची कमाई केली. लक्षणीय म्हणजे मंगळवारी बँक परवान्यांसाठी उत्सुक खासगी वित्तीय कंपन्यांचे समभागांनी केलेली कमाई, आज या समभागांत लक्षणीय नफावसुली झाल्याने संपूर्णपणे धुवून निघाली. बँकोत्सुक कंपन्यांचे समभाग २ ते ४ टक्क्य़ांच्या फरकाने आपटले.
विदेशी वित्तसंस्थांनी आज बाजारात खरेदीचा हात दिला आणि दिवसाची सुरुवातच सेन्सेक्सने २१,००५.०४ या उच्चांक पातळीवरून केली. गेल्या सलग चार सत्रात मजल दर मजल करीत सेन्सेक्सने ४५०.३५ अंश गाठीला बांधले आहेत. या अगोदर सरलेल्या २४ जानेवारीला सेन्सेक्स २१,३३३ या स्तरावर बंद झाला होता. त्यानंतर आज पुन्हा सेन्सेक्सला हा २१ हजारापल्याड स्तर गवसला. निफ्टीनेही बुधवारच्या व्यवहारात ६,२३८.८० या स्तरावर मजल मारली.