भांडवली बाजारातील घसरण आज नव्या सप्ताहाच्या प्रारंभीही कायम राहिली. सोमवारी सलग आठव्या सत्रात ‘सेन्सेक्स’ खाली आला. दीर्घ कालावधीसाठी सलग घसरणीत मुंबई निर्देशांकाने मे २०११ ची बरोबरी केली आहे. सोमवारच्या २४.२० अंश घसरणीसह ‘सेन्सेक्स’ १९,४६०.५७ वर तर ५.६५ अंश नुकसानामुळे ‘निफ्टी’ने सोमवारी ५,९०० चाही स्तर मोडला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या हा प्रमुख निर्देशांक आता ५,८९७.८५ वर स्थिरावला आहे.
आजच्या घसरणीमुळे भांडवली बाजार २०१३ मधील आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर आला आहे.
मे २०११ मध्येही ‘सेन्सेक्स’ अशाच दीर्घ सत्रांदरम्यान घसरता राहिला. यंदाच्या आठ व्यवहारातील मुंबई निर्देशांकातील एकूण घसरण ५४४ अंशांची राहिली आहे. यातून निर्देशांक २० हजारांपासून मोठय़ा प्रमाणावर फारकत घेताना आढळून आला. आयटीसी, एचडीएफसी, एल अ‍ॅन्ड टी, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, भारती एअरटेल, टीसीएस, मारुती सुझुकी यांचे समभाग घसरले.