मुंबई : भांडवली बाजारात अस्थिरतेचे वातावरण कायम असून शुक्रवारच्या संपूर्ण सत्रात तेजीवाले आणि मंदीवाले यांच्यात रस्सीखेच सुरू राहिली आणि अखेर तेजीवाल्यांचा त्यात विजय झाला. जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या ओघामुळे सप्ताहाअखेर सकारात्मक पातळीवर बंद नोंदवण्यास प्रमुख निर्देशांक यशस्वी ठरले.
जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांचे अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्र्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणाकडे लक्ष लागले आहे. व्याजदर वाढीबाबत त्यांच्या भूमिकेबाबत साशंकता असल्याने सावधपणे वाट पाहण्याची गुंतवणूकदारांची भूमिका दिसून येत आहे. याच कारणामुळे अवघ्या ५९.१५ अंशांची वाढ होऊन, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५८,८३३.८७ पातळीवर शुक्रवारी दिवसअखेर स्थिरावला. दिवसभरात त्याने ५४६.९३ अंशांची उसळी घेत ५९,३२१.६५ अंशांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. मात्र अखेरच्या तासात समभाग विक्रीचा मारा सुरू झाला आणि सेन्सेक्सने काही काळ नकारात्मक पातळीतही प्रवेश केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ३६.४५ अंशांची कमाई केली आणि तो १७,५५८.९० पातळीवर स्थिरावला.
जागतिक पातळीवर गुंतवणूकदार फेडरल रिझव्र्हच्या जेरोम पॉवेल यांचा पतविषयक दृष्टिकोन आणि मूल्यमापनाची प्रतीक्षा करत आहेत. परिणामी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला, तर काही हवालदिल गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. बाजाराचा नेमका कल हा महागाईला रोखण्यासाठी फेडरल रिझव्र्हकडून काय पावले उचलली जातात यातून ठरविला जाईल, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समध्ये एनटीपीसी, टायटन, पॉवर ग्रिड, कोटक महिंद्रा बँक, लार्सन अँड टुब्रो, टेक महिंद्रा, टाटा स्टील आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे समभाग सर्वाधिक तेजी दर्शवित होते. तर दुसरीकडे इंडसइंड बँक, एचडीएफसी, एशियन पेंट्स आणि भारती एअरटेलच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली.
ऑगस्टमध्ये ५०,००० कोटींची ‘विदेशा’तून खरेदी
देशांतर्गत पातळीवर महागाई कमी झाल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजाराकडे मोर्चा वळवला आहे. ऑगस्ट महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ५०,००० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले. हा मागील २० महिन्यांतील त्यांच्याकडून झालेल्या समभाग खरेदीचा उच्चांक आहे. अन्नधान्य आणि उत्पादित वस्तूंच्या कमी झालेल्या किमती आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सावरलेल्या रुपयामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना भारताच्या भांडवली बाजाराने पुन्हा आकर्षित केल्याचे दिसून येते.